दहा गावांचा पाणीपुरवढा होणार बंद
By Admin | Published: February 14, 2015 12:06 AM2015-02-14T00:06:01+5:302015-02-14T00:06:24+5:30
जीवनप्राधीकरणची नोटीस : थकबाकीचा गांधीनगर, उजळाईवाडी, उचगांवसह इतर गावांना फटका
कोल्हापूर : गांधीनगरसह १३ गावच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनअंतगर्त गांधीनगर, वळीवडे, उजळाईवाडी, गोकुळ शिरगावसह दहा गावांना जीवनदायी ठरलेल्या योजनेचा पाणीपुरवठा मंगळवार (दि. १७)पासून बंद करण्यात येणार असल्याची नोटीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे शुक्रवारी देण्यात आली. या गावांना वारंवार सांगूनही त्यांनी थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे.
२००१ पासून गेली १३ वर्षे या योजनेतील दहा गावात पाणीपुरवढा सुरु आहे. दूधगंगा नदीतून स्वच्छ व नियमित पाणीपुरवढा होत असल्याने या परिसरात उपनगरांची झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे कनेक्शन धारकांची संख्याही मोठी आहे. जादा दर असूनही नियमित पाणीपट्टी भरत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगीतले. तरीही या योजनेतील दहा गावांची गेल्या अनेकवर्षापासूनची एकत्रित थकबाकी दोन कोटी ६९ लाख ५० हजार इतकी आहे.
थकबाकी भरावी यासाठी प्राधिकरणाने या ग्रामपंचायतींना वारंवार सूचना दिल्या आहेत. परंतु, त्यांनी दखल न घेतल्याने जीवन प्राधिकरणने पाणीपुरवढा बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्यास व अन्य ठिकाणाहून आणलेले पाणी पिऊन रोगराई झाल्यास त्यास प्राधिकरण जबाबदार नसल्याचेहीे या विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान पाणीपुरवढा बंद होणार असल्याची कुणकुण लागल्याने या परिसरातील नागरिकांचे धाबे दणाणले असून अनेकांनी नियमित पाणीपट्टी भरुनही थकबाकी कशी? असा सवाल करीत अनेकांनी संताप व्यक्त केला.
गावनिहाय थकबाकी
गांधीनगर : ३५ लाख ४१ हजार
वळिवडे : ९ लाख ८० हजार
गडमुडशिंगी : २९ लाख ४८ हजार
उचगाव : १ कोटी २९ लाख ४६ हजार
उजळाईवाडी : ५० लाख ६१ हजार
गोकुळ शिरगाव : ५ लाख ६४ हजार
तामगाव : २ लाख २७ हजार
नेर्ली : १ लाख ६५ हजार
कणेरी : ३ लाख ४६ हजार
सरनोबतवाडी : २ लाख ६७ हजार