इतिहासाचे विद्रुपीकरण थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 12:13 AM2017-01-04T00:13:59+5:302017-01-04T00:13:59+5:30
श्रीपाल सबनीस : महाराष्ट्र घडवण्यासाठी इमानदार लेखक, वाचकांची गरज
आजरा : जोपर्यंत मानव जिवंत आहे, तोपर्यंत संस्कृती टिकून राहणार आहे. वाचनाची पद्धत बदलली तरी वाचन प्रक्रिया अखंड आहे. आज महापुरुषांना इतिहासाचे विदु्रपीकरण करून जातींच्या चौकटीत कोंडून मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी इतिहासाचे विद्रुपीकरण थांबवा व यासाठी लेखक, समीक्षक व वाचकांनी इनामदारीने वागण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘महाराष्ट्राची वाचन संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते.
डॉ. सबनीस म्हणाले, वाचनालये ही समाजाची मंदिरे आहेत. मंदिर संस्कृती कमी पडल्यानंतर मानवी जीवनातील भौतिक दु:खे दूर करण्यासाठी वाचनालये उदयास आली. महाराष्ट्रामध्ये ज्ञानाची भूक कायम आहे. माहितीने परिपूर्ण असणाऱ्या २१ व्या शतकात धर्म-जातीमध्ये अडकून संतांची वाटणी करणे चुकीचे आहे.
सर्व संत आत्मिक भावाने एकमेकांशी तादात्म्य पावले असताना त्यांच्यामध्ये भेदरेषा निर्माण करणारे आपण कोण. या भेदरेषेमुळे वाचकांमध्येही गट पडले आहेत. लेखकही सोयीनुरूप महापुरुषांचे सादरीकरण करू लागल्याने समृद्ध व सत्यनिष्ठ वाचक तयार होण्याची गरज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संदर्भ विश्वाला आवश्यक आहे. वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारे साहित्य मागे पडत आहे, ही जमेची बाजू आहे. यावेळी डॉ. सबनीस यांनी वाचन व साहित्यसंस्कृतीचा चौफेर आढावा घेतला.
याप्रसंगी संभाजीराव इंजल, जयराम देसाई, डॉ. शिवशंकर उपासे, सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई, सुभाष विभूते, प्रा. राजा शिरगुप्पे, मल्लाप्पाण्णा चौगुले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व साहित्यप्रेमी उपस्थित होते.