लाभार्थ्यांची चौकशी थांबवा
By admin | Published: January 2, 2015 10:20 PM2015-01-02T22:20:19+5:302015-01-03T00:02:11+5:30
तहसील कार्यालय : कागलमध्ये राष्ट्रवादीचा विराट मोर्चा
म्हाकवे : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन सुरू असणारी अन्यायकारक चौकशी थांबवावी, यासाठी कागल तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.
यावेळी वयोवृद्धांसह पात्र लाभार्थ्यांनी गरिबांची पेन्शन बंद करण्याचा युती शासनासह चौकशीला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अशा घोेषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.
कागल बससस्थानक समोरून या मोर्चास सुरूवात झाली. तहसीलदार कार्यालयामोर हा मोर्चा आल्यानंतर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. तालुक्याच्या कानाकोपऱ्यांत वयोवृद्ध महिलांसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, म्हाकवेकर, नगराध्यक्षा आशाकाकी माने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, कागल शहराध्यक्ष रघुनाथ जकाते, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, संजय हेगडे, सूर्यकांत पाटील, पांडुरंग सोनुले, बळवंत माने, आदींनी केले.
प्रमुख शिष्टमंडळात तहसीलदार शांताराम सांगडे यांना मागण्यांचे निवेदन दिले आणि चौकशी तत्काळ थांबवण्याची मागणी केली. यावेळी मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन तहसीलदार सांगडे यांनी दिले असल्याचे शिवानंद माळी यांनी सांगितले.
.
...तर कार्यालय बंद पाडू
कागल तालुक्यातील लाभार्थ्यांची राधानगरी तालुक्यातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जात आहे, असा सवाल करत शिवानंद माळी म्हणाले, आमदार मुश्रीफांनी तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांना योजनेत सहभागी करून लाभ दिला आहे. या पोटशुळातून विरोधकांनी निष्कारण चौकशीचा ससेमिरा गरीब लाभार्थ्यांच्या पाठीमागे लावला आहे. मात्र, एका लाभार्थ्यांची पेन्शन बंद करून दाखवा, तहसीलदार कार्यालय बंद पाडू, असा इशाराही देण्यात आला.
... तर मोदींना
काळे झेंडे दाखवू
गरिबांना मिळणाऱ्या नाममात्र पेन्शनरवही युती शासनाने बंदी घालण्याच्या उद्देशाने लाभार्थ्यांच्या चौकशीचे नाटक केले आहे. ही चौकशी तत्काळ बंद करावी, अन्यथा मंत्र्याना कोल्हापूर बंद करू. तसेच उद्या, शनिवारी कोल्हापुरात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करू, असा इशाराही माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी दिला.