रेंदाळचा यंत्रमाग व्यवसाय बंदच

By admin | Published: November 19, 2014 10:45 PM2014-11-19T22:45:56+5:302014-11-19T23:24:51+5:30

यंत्रमाग उद्योगामध्ये चिंतेचे वातावरण : काही ठिकाणी केवळ एकाच पाळीत कारखाने सुरू

Stop the looming power business | रेंदाळचा यंत्रमाग व्यवसाय बंदच

रेंदाळचा यंत्रमाग व्यवसाय बंदच

Next

तानाजी घोरपडे =- हुपरी --दिवाळी सुटीमध्ये बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप कामावर परत आलेले नाहीत. अगोदरपासूनच असलेला कामगारांचा तुटवडा व त्यामध्येच कामगार संघटनांनी केलेला मजुरीवाढीचा प्रस्ताव रेंदाळ यंत्रमाग कापड उत्पादक असोसिएशनने गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित ठेवल्याने कामगारांमध्ये निर्माण झालेली नाराजी या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रेंदाळ व परिसरातील यंत्रमाग उद्योगामध्ये चिंतेचे व संभ्रमावस्थेचे वातावरण पसरले आहे. परिणामी, केवळ एकाच पाळीत (दिवसपाळी) कारखाने सुरू राहिले आहेत.
रेंदाळ व परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग उद्योग चालविला जातो. याठिकाणी लालबावटा जनरल कामगार युनियन, जनरल लेबर युनियन व सर्व श्रमिक संघ अशा तीन कामगार संघटना कार्यरत आहेत. या तीनही कामगार संघटनांनी मिळून इचलकरंजीप्रमाणे ३६ पिकास ८३ पैसे मजुरी मिळावी, अशी मागणी एक वर्षांपूर्वी केली होती. मात्र रेंदाळ यंत्रमाग कापड उत्पादक असोसिएशनने ही मागणी अद्यापपर्यंत प्रलंबित ठेवली आहे. कामगार संघटनांनी केलेली मागणी व प्रत्यक्षात कामगारांना मिळणारी मजुरी यामध्ये प्रति पिकास पाच पैशांची तफावत आहे. याप्रश्नी निर्णयच घेण्यात आला नसल्यामुळे यंत्रमागधारक व कामगार यांच्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी, कामगारांमध्ये नाराजी पसरली असून गेल्या अनेक वर्षांपासून मालक व कामगार यांच्यामध्ये असणाऱ्या ऋणानुबंधास यामुळे तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यंत्रमाग उद्योगामध्ये आतापर्यंत निर्माण झालेल्या बऱ्या-वाईट अनेक प्रसंगावेळी दोघांमध्ये कधीही कटुता निर्माण झाल्याचा प्रसंग अनुभवण्यास मिळालेला नाही. प्रत्येकवेळी समन्वयाने मार्ग काढत दोघांनीही ऋणानुबंधाची वीण उसवू न देता एकमेकांना आधार देत ही वीण घट्ट करण्याचाच प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे वेगळेच नाते निर्माण झाल्याचे पहावयास मिळत असताना यावेळी मात्र मजुरीवाढ प्रकरणामुळे या दोघांमध्ये कटूता निर्माण होण्याचा धोका संभवतो आहे. पूर्वीपासूनच या उद्योगामध्ये कामगारांचा तुटवडा असताना दिवाळी सुटीमध्ये बाहेरगावी गेलेले कामगारही अद्यापपर्यंत कामावर परत आलेले नाहीत. त्यामुळे बरेच कारखाने अजूनही बंद आहेत. तर काहींनी कामगारांची जुळवाजुळव करीत तर काहींनी स्वत:सह घरातील सदस्याला यंत्रमागावर उभे करून कारखाने सुरू केले आहेत. अशा प्रकारची उठाठेव करूनही केवळ दिवसपाळीमध्येच कारखाने सुरू राहिल्याचे पहावयास मिळत आहे.

रेंदाळ यंत्रमाग कापड उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष रावसाहेब तांबे म्हणाले, कामगार संघटनांनी केलेल्या मजुरीवाढीबाबत त्यांच्याशी वेळोवेळी सकारात्मक चर्चा झाली आहे. कामगारांनी ३६ पिकास ८३ पैसे मजुरी मिळण्याची मागणी केली आहे. इचलकरंजी व आमच्यामध्ये पाच पैशांचा फरक आहे. त्यामध्ये बदल करून आम्ही त्यांना समाधानकारक वाढ देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच दिवाळीसाठी बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप परत आलेले नाहीत.

Web Title: Stop the looming power business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.