लुटणे बंद करा, शेतकरी सुखी होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:57 AM2018-04-09T00:57:30+5:302018-04-09T00:57:30+5:30
भोगावती/ आमजाई व्हरवडे : ज्या झेंड्याखाली शेतकऱ्यांना मारले जाते ते झेंडे फेकून देण्याची वेळ आली आहे. दारू प्याल्याने शेतकºयांच्या आत्महत्या होतात असे सांगणाºया सरकारला लाज वाटली पाहिजे. सरकारचे धोरण लुटीचे आहे. लुटणे बंद करा शेतकरी सुखी होईल, असा घणाघाती आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील होते.
बच्चू कडू म्हणाले, काँग्रेसचा झेंडा मिळो न मिळो प्रहारचा झेंडा तुम्हाला आताच देतो. राज्यातील बहुसंख्य आमदारांची संपत्ती एक हजार कोटींपेक्षा अधिक आहे. जातीच्या नावावर आमदार होण्यापेक्षा सेवा करून आमदार होणे गरजेचे आहे.
पी. एन. पाटील म्हणाले, राधानगरी-भुदरगडची जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी, या जागेवर अरुण डोंगळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
अरुण डोंगळे म्हणाले, कार्यकर्त्यांचे पाठबळ ही माझी शक्ती आहे. कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मी लढवणार आहे.
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक पी. डी. धुंदरे, बाजीराव खाडे, सत्यजित पाटील, माजी आ. दिनकरराव जाधव, रवींद्र आपटे, विलास कांबळे, भोगावतीचे संचालक कृष्णराव किरुळकर, सदाशिवराव चरापले, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, हिंदुराव चौगले, विश्वनाथ पाटील, प्रा. ए. डी.चौगले, सुशील पाटील, धैर्यशील देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, पी. बी. कवडे, सुधाकर साळुंखे आदींनी डोंगळे यांना शुभेच्छा दिल्या. आभार बी. आर. पाटील यांनी मानले.