खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:16 AM2021-06-11T04:16:47+5:302021-06-11T04:16:47+5:30
कोल्हापूर : कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी, आयसीयूच्या युनिटमधील सीसीटीव्हीवरून दर तासांनी नातेवाइकांना रुग्णाची स्थिती ...
कोल्हापूर : कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी, आयसीयूच्या युनिटमधील सीसीटीव्हीवरून दर तासांनी नातेवाइकांना रुग्णाची स्थिती बाहेरील रूममध्ये दाखविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनात रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचाराचे दरपत्रक लावण्यात यावेत, रुग्णालयातील मेडिकल दुकानांतून औषधे घेण्याची सक्ती केली जाते. येथे बाहेरील दुकानांपेक्षा ६० टक्के दर जास्त आहे. या दुकानांना शासकीय मान्यता आहे काय हे तपासून दुकाने त्वरित बंद करावीत. रुग्णाचे ‘डेथ ऑडिट’ त्वरित करून जनतेसमोर जाहीर करावे. जे रुग्ण घरी राहून उपचार घेत आहेत, त्यांना विमा कंपन्या मेडिकल बिले देत नाहीत, तरी त्यांनाही बिले मंजूर करण्याचे विमा कंपन्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, प्रमोद पुगांवकर, चंद्रकांत पाटील, राजेश वरक, अंजूम देसाई, लहुजी शिंदे, विजय पोळ उपस्थित होते.
--
--