अधिकाऱ्यांचे पगार थांबवा : सुरेश खाडे
By Admin | Published: May 6, 2016 11:52 PM2016-05-06T23:52:09+5:302016-05-07T00:57:10+5:30
पालिकेवर ताशेरे : दुर्लक्षामुळे अनेक कामात त्रुटी
कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांत मागासवर्गीयांचा ८५ जागांचा अनुशेष भरलेला नाही, दोन वर्षांपासून रोस्टर तपासणी झालेली नाही, कोणतीही नोटीस न देता झोपडपट्ट्या पाडल्या, अशा अनेक त्रुटी महापालिकेमध्ये दिसून आल्या आहेत. ही परिस्थिती अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व बेफिकीरपणामुळे झाली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे पगारच थांबविण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खाडे म्हणाले, महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आली होती. या समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय या संस्थांना भेटी दिल्या आहेत. या ठिकाणी अनुसूचित जातीचा १३ टक्के अनुशेष भरला आहे की नाही?, समाजकल्याण विभागाकडून दलितवस्ती सुधारणा यासाठी आलेला निधी त्याच कारणांसाठी खर्च झाला आहे का?, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते का?, आदी माहितीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेचेही काम चांगले आहे; परंतु महापालिकेच्या कारभाराची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी गेल्यावर या ठिकाणी अनेक त्रुटी दिसून आल्या. त्या गंभीर आहेत. २०१० पासून या ठिकाणी मागासवर्गीयांचा अनुशेष भरलेला नाही. २०१४ नंतर रोस्टरची तपासणीच झालेली नाही. झोपडपट्ट्या पाडताना कोणालाही नोटिसा दिल्या नाहीत. यासाठी येथील अधिकारीच जबाबदार आहेत. त्यांनी आपले काम योग्यरीतीने केलेले नाही. त्यासाठी त्यांचे पगारच थांबविण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्याचबरोबर येथील त्रुटींबाबत उचित निर्णय सचिवांच्या साक्षीने घेण्यात येईल. एक महिन्यात या सर्व त्रुटी दूर करून याचा अहवाल विधिमंडळाकडे सादर करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी वैयक्तिक जागा उपलब्ध नाही. त्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधावीत. यासाठी पाण्याची व्यवस्था पालिकेने करावी. (प्रतिनिधी)