जिभेचे लाड थांबवा, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:30 AM2021-09-04T04:30:22+5:302021-09-04T04:30:22+5:30
कोल्हापूर : जास्तीचे तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटातील अल्सर होऊ शकतो. अवेळी जेवण करणे. अति जंक फूड खाल्ल्यानेही ...
कोल्हापूर : जास्तीचे तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटातील अल्सर होऊ शकतो. अवेळी जेवण करणे. अति जंक फूड खाल्ल्यानेही या आजाराची बाधा होऊ शकते. म्हणूनच वैद्यकीय तज्ज्ञ जिभेचे लाड थांबवा, तिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर असा सल्ला देतात.
अल्सरमुळे पोटातील आतड्याला, जठराला जखम होते. योग्य उपचार आणि पथ्य केल्यास अल्सर बरा होतो. पण हा आजार त्रासदायक आहे. अति धूम्रपान, तंबाखू, गुटखा, दारूचे सेवन करणे, अवेळी, मसालेदार जेवण करणे, सातत्याने जंक फूड खाणे, तळलेले पदार्थ खाणे यामुळे अल्सर होऊ शकतो. पोटाचा अल्सर झाल्यास वारंवार पित्त होणे, पोट दुखणे, पोटात जळजळ होणे, आग होते. यामुळे जेवणावर परिणाम होतो. त्यामुळे प्रकृती झपाट्याने खालावते. पोटाचा अल्सर असल्यास वेळीच उपचार न घेतल्यास लहान आतड्याला छिद्र पडणे, पोटात रक्तस्त्राव होणे असा धोका असतो.
१) काय आहेत अल्सरची लक्षणे
पोट दुखणे
उलट्या होणे
भूक मंदावणे
वजनात अचानक घट होणे
२) काय काळजी घ्यावी ?
तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन करू नये. सातत्याने पोटाचा विकार उद्भवल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. भूक नसताना खाणे टाळले पाहिजे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावा
३) पौष्टिक आहार महत्त्वाचा
कोट
अल्सर आजार न होण्यासाठी तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजे. वेळेत व पौष्टिक आहार घ्यावा. पुरेशा प्रमाणात झोप घ्यावी. जेवणानंतर तातडीने झोपणे टाळावे.
- डॉ. सुशांत रेवडेकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
तळलेले, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाचा अल्सर होण्याचा धोका असतो. तंबाखू सेवनामुळे तोंडाला अल्सर होण्याची शक्यता असते. यामुळे तंबाखूचे व्यसन करू नये. जागरण करू नये. वेळच्या वेळी जेवण करावे. शिळं अन्न खाऊ नये.
- डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रूग्णालय, कोल्हापूर