यंत्रमागधारकांचा रास्ता रोको
By admin | Published: July 30, 2016 12:20 AM2016-07-30T00:20:52+5:302016-07-30T00:32:51+5:30
इचलकरंजीत आंदोलन : वस्त्रोद्योगातीलमंदीकडे केंद्र, राज्य शासनाचे दुर्लक्ष
इचलकरंजी : वस्त्रोद्योगातीलमंदीकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी यंत्रमागधारकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासाभराच्या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, आज, शनिवारी आंदोलनस्थळी आमदार सुरेश हाळवणकर हे सकाळी ११ वाजता भेट देणार असून, यावेळी यंत्रमागधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जीवन बरगे यांनी केले आहे.
गेल्या वर्षीपासून वस्त्रोद्योगावर मंदीचे सावट पसरले आहे. याबाबत वेळोवेळी सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याबरोबर विविध मार्गांनी आंदोलने करण्यात आली; परंतु सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. या संकटांमुळे यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे. त्यामुळे यंत्रमाग व्यवसायाबद्दल शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ यंत्रमागधारकांनी तीन दिवसांपासून प्रांत कार्यालय चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
शुक्रवारी तिसऱ्या दिवशी प्रांत कार्यालय चौकात ठिय्या मारत रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात जीवन बरगे, अमोद म्हेतर, रामचंद्र हावळ, जनार्दन चौगुले, रावसाहेब तिप्पे, बाळकृष्ण लवटे, सागर चाळके, अजित जाधव, अमृत भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, यंत्रमागधारक सहभागी झाले होते.
दरम्यान, आंदोलनस्थळी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. तसेच आंदोलन सुरू असताना आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आमदार हाळवणकर यांनी वस्त्रोद्योगातील समस्यांबाबत सर्वच केंद्रात आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात आपण सोमवारी (दि. १ आॅगस्ट) अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. त्यावर मंगळवारी सभागृहात चर्चा होऊन यंत्रमागधारकांना व्याजात सवलत व सवलतीच्या दरात वीजपुरवठा हे मुद्दे प्रामुख्याने सोडविले जातील, असे आंदोलकांना सांगितले. (वार्ताहर)