पिंपळगावात शिवसेनेचा रास्ता रोको

By admin | Published: July 19, 2016 11:44 PM2016-07-19T23:44:29+5:302016-07-19T23:48:08+5:30

पठारावरील बांध फोडल्याचे प्रकरण : बांध पूर्ववत बांधावा, दोषींवर कारवाई करा : देवणे

Stop the path of Shivsena at Pimpalgaon | पिंपळगावात शिवसेनेचा रास्ता रोको

पिंपळगावात शिवसेनेचा रास्ता रोको

Next

उत्तूर : भुदरगड तालुक्यातील मेघोलीच्या पठारावरील म्हातारीच्या पठारावर घालण्यात आलेला बांध अज्ञातांनी सोमवारी फोडला. तो बांध वनविभागाने पूर्ववत बांधावा व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी पिंपळगाव (ता. भुदरगड) येथे शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या रास्ता रोकोप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.
गारगोटी-उत्तूर मार्गावर पिंपळगाव येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. यावेळी दोन्ही बाजंूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. देवणे म्हणाले, म्हातारीच्या ओढ्यावरील पाणी वळल्यामुळे चिकोत्रा धरण भरेल, अशी आशा निर्माण झाली होती; पण बांध फोडून समाजकंटकांनी शेतकऱ्यांच्या ताटात विष ओतण्याचे काम केले आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून ही योजना राबविली. नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी. त्यांच्या पाठीशी कोणीही राहू नये.
पठारावर पाण्याचे नियोजन करताना जिल्हाधिकारी व वनसंरक्षक यांच्यात झालेल्या बैठकीवेळी पठारावरील पाणी गरजेनुसार मेघोली प्रकल्पाकडे वळविण्यासंदर्भात विचार विनियम झाला होता. अजून पावसाळा सुरू आहे. चिकोत्रा प्रकल्पात थोडा पाणीसाठा झाल्यानंतर उर्वरित पाणी मेघोली प्रकल्पाकडे वळविण्याचे नियोजन होते. मात्र, समाजकंटकांनी आततायीपणा केला. अशा घटना घडू नयेत यासाठी वन खाते, पोलिस खाते व पाटबंधारे विभाग यांनी योग्य भूमिका घ्यावी; अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल. उपजिल्हाप्रमुख प्रवीणसिंह सावंत, आदींची भाषणे झाली.
यावेळी उपतालुकाप्रमुख अशोक पाटील, अविनाश शिंदे, विक्रम पाटील, तानाजी देसाई, सुरेश पाटील, वनक्षेत्रपाल अशोक पाटील, वनपाल शीतल पाटील, वनसंरक्षक अमोल चव्हाण, पाटबंधारे शाखा अभियंता यू. एम. कापसे, मंडल अधिकारी ए. आर. कोळी, आदी उपस्थित होते.

पंधराजणांवर वन विभागाकडून गुन्हा दाखल
गारगोटी : म्हातारीच्या पठारावर वन विभागाने वन्य जिवांसाठी बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत सोमवारी संध्याकाळी अज्ञात दहा ते पंधराजणांनी फोडल्याप्रकरणी भुदरगड वन विभागाचे वनक्षेत्रपाल ए. एस. पाटील यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पिंपळगाव खोऱ्यातील बेडीव धनगरवाड्याच्या म्हातारीच्या पठारावर वन विभागाने बंधारा घालून पाणी अडविले. हे पाणी चिकोत्रा प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याने अज्ञातांनी बंधाऱ्याचा बांध सोमवारी संध्याकाळी फोडला. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले आहे. मेघोलीच्या काही समाजकंटकांनी हा बांध फोडल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य विश्वनाथ कुंभार यांनी केला. सोमवारी संध्याकाळी घटनास्थळी विश्वनाथ कुंभार यांनी नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, मंडल अधिकारी कोळी, वनक्षेत्रपाल ए. एस. पाटील, वनपाल शीतल पाटील, दीपक पाटील, आदींसमवेत प्रत्यक्ष भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली. दरम्यान, या कामास मेघोली परिसरातील लोकांनी पहिल्यापासून विरोध दर्शविला. कारण हे पाणी मेघोली प्रकल्पाऐवजी चिकोत्रा प्रकल्पात सोडण्यात येणार होते. या नव्या बंधाऱ्यात १०० एम. सी. एफ. टी. पाणी साठवण क्षमता आहे. हे पाणी मेघोलीला मिळावे, या हेतूने अज्ञातांनी बंधाऱ्याचा बांध फोडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर. जी. पाटील हे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.


बांध फोडला;
पण पाणी वाया!
म्हातारीच्या पठारावरील बांध फोडण्यात यशस्वी झालेल्या समाजकंटकांनी बांध फोडला; पण पाणी मेघोलीच्या प्रकल्पाकडे न जाता ते दुसरीकडे गेले. त्यामुळे लाखो क्युसेस पाणी वाया गेल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती.

Web Title: Stop the path of Shivsena at Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.