कसबा बावड्यात पाण्यासाठी रास्ता रोको, दोन्ही बाजूला महिलांनी दीड तास वाहतूक रोखली;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:48 AM2018-09-06T00:48:02+5:302018-09-06T00:48:17+5:30
पुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ बुधवारी मुख्य रस्त्यावर धनगर गल्लीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
कसबा बावडा : अपुऱ्या व अनियमित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ बुधवारी मुख्य रस्त्यावर धनगर गल्लीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये धनगर गल्ली, अतिग्रे गल्ली, ठोंबरे गल्लीमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तब्बल दीड तास झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. धनगर गल्लीत पाण्याचा व्हॉल्व्ह बसवून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल हे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
धनगर गल्ली, अतिग्रे गल्ली, ठोंबरे गल्ली यासह परिसरातील गल्ल्यांमध्ये नेहमीच अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे या भागातील महिला संतप्त झाल्या होत्या. पाणी येण्याची निश्चित वेळ नाही. रात्री-अपरात्री कधीही पाणी येते. पाण्यासाठी अख्खी रात्र जागून काढावी लागते. यामुळे प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून सकाळी ११ वाजता मुख्य रस्त्यावरच महिलांनी ठिय्या मांडला. यावेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण आयुक्त आल्याशिवाय आता मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली.
तब्बल तासाभरानंतर जलअभियंता सुरेश कुलकर्णी व उप जलअभियंता राजेंद्र हुजरे यांनी आंदोलक महिलांशी चर्चा करून पाणीपुरवठा लवकरच सुरळीत केला जाईल, असे सांगितले. यावेळी नगरसेविका माधुरी लाड व अभिजित जाधव यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात आनुबाई करपे, कल्पना वावरे, छाया ठोंबरे, शांताबाई हराळे, संगीता धामणे, मंगल हराळे, सुजाता जाधव, शुभांगी पिंगळे, नीता ठोंबरे, सुवर्णा भाडळकर, कल्पना ठोंबरे, वैशाली ठोंबरे, अर्चना भाडळकर, अंजना चौगले, राजाक्का मगदूम, सुलोचना भाडळकर, ललिता माधव, कोमल सोनटक्के सहभागी झाल्या होत्या.
संतापाची लाट
धनगर गल्ली, अतिग्रे गल्ली, ठोंबरे गल्ली यासह परिसरातील गल्ल्यांमध्ये नेहमीच अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे या भागातील महिला संतप्त. रात्री-अपरात्री कधीही पाणी येते. पाण्यासाठी अख्खी रात्र जागून काढावी लागते. यामुळे प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून मुख्य रस्त्यावरच महिलांचे ठिय्या आंदोलन