बावड्यात पाण्यासाठी रास्ता रोको
By admin | Published: August 24, 2016 12:56 AM2016-08-24T00:56:25+5:302016-08-24T01:00:58+5:30
संतप्त महिलांचा ठिय्या : खराब पाईपलाईन बदलण्याच्या प्रारंभानंतरच आंदोलन मागे; पालिकेचे अधिकारी धारेवर
कसबा बावडा : शहरात पाण्यासाठी अनेकवेळा ठिकठिकाणी रास्ता रोको, आंदोलने झाली, त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन काही तरी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले जात असल्याचा आजवरचा अनुभव; मात्र याला मंगळवारी कसबा बावड्यातील धनगर गल्लीतील महिलांनी पाण्यासाठी केलेले रास्ता रोकोचे आंदोलन अपवाद ठरले. महापौर अश्विनी रामाणे यांनी खराब पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ केल्यानंतरच संतप्त महिलांनी हे आंदोलन मागे घेतले.
गेली अनेक वर्षे धनगर गल्ली, कवडे गल्ली, चौगले गल्ली, चव्हाण गल्ली, वाडकर गल्ली, आदी भागांत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे; मात्र याचा सर्वाधिक फटका धनगर गल्लीतील नागरिकांना बसत होता. या गल्लीतील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून आतापर्यंत महापौर, आयुक्त, जलअभियंता व नगरसेवक यांना वारंवार निवेदन दिली. तसेच दोनवेळा रास्ता रोकोही केला. परंतु, प्रत्येक वेळी या गल्लीतील नागरीकांना आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. मंगळवारपासून दररोज पाणीपुरवठा करण्याची घोषणा महापालिकेने सर्वसाधारण सभेत केली होती. मात्र, पहिल्याच दिवशी धनगर गल्लीत अपुरे व कमी दाबाने पाणी आल्याने येथील संतप्त महिलांनी नियमीत पाणी पुरवठ्याची मागणी करीत मुख्य रस्त्यावर तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात झाली. आंदोलनात महिला घागरी व पाण्याच्या बादल्या घेऊनच सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याबाबत सांगितले; मात्र त्या जागच्या हालल्या नाहीत. यामुळे ऐन रहदारीवेळीच वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडली.
दुपारी एकच्या सुमारास महापौर अश्विनी रामाणे, उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पोवार आंदोलनस्थळी आले. मात्र, त्यांच्यावर महिलांनी प्रश्नांचा भडिमार केला. दोन-अडीच हजार पाण्याचे बिल घेता, सांडपाणी चार्ज घेता; पण पाणी मात्र वेळेवर येत नाही, असा सवाल करताच सर्व अधिकारी निरुत्तर झाले. आंदोलकांना उपायुक्त, जलअभियंता यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र, महापौर अश्विनी रामाणे यांनी खराब पाईपलाईन बदलण्याच्या कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ केल्यानंतरच संतप्त महिलांनी हे आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रभागाचे नगरसेवक अशोक जाधव यांनी यासाठी सात लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले.
या आंदोलनात कल्पना वावरे, संगीता धामणे, मंगल करपे, वृत्तपत्र विक्रेते शंकर चेचर, अभिजित जाधव, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांची महिलांशी चर्चा
आंदोलनस्थळी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अनेक अधिकारी दाखल झाले. त्यांनी आंदोलन मागे घेण्यासंदर्भात इतर नागरिकांशी चर्चा सुरू केली; मात्र संतप्त महिलांनी पाणी पुरुष भरत नाहीत, महिला भरतात. त्यामुळे महिलांशी चर्चा करा, असा सज्जड दमच दिला. त्यामुळे अधिकाऱ्यांना महिलांशी चर्चा करणे भाग पाडले.