शेतकऱ्यांची ऊसतोडीतून होणारी लुट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:34+5:302021-01-19T04:25:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला ऊस कारखान्याला पाठवताना ऊसतोड मजूर व ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांची प्रचंड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला ऊस कारखान्याला पाठवताना ऊसतोड मजूर व ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक करत आहेत. साखर सहसंचालक, कारखानदार, ऊस तोडणी-वाहतूक मंडळ व शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेऊन ही लूट थांबवावी, अशी मागणी जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकुश या संघटनांनी सोमवारी केली. ‘लोकमत’मध्ये ‘खुशाली की खंडणी’ या मालिकेद्वारे शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यात आली होती, त्याचाच आधार घेत ही मागणी करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली आहे. या निवेदनात कोल्हापुरात सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरु असून, मजूर एकरी ५ ते ७ हजार रुपये घेतल्याशिवाय ऊस तोडत नाहीत. चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागात तर खेपेला ३ ते ४ हजार रुपये घेतले जातात. ट्रॅक्टर मालकही खेपेला ड्रायव्हरला ३०० रुपये एन्ट्री घेत आहेत. कोरोनामुळे मजूर कमी आल्याचे सांगितले जाते. मजूर कमी आले असतील तर साखर कारखाने पूर्ण क्षमतेने कसे सुरु आहेत, याचा अर्थ कारखानेसुद्धा या प्रकारात सामील आहेत का, अशी शंका शेतकऱ्यांना आहे. वास्तविक ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बिलातून तोडणी, वाहतूक मजुरांना व ट्रॅक्टर मालकांना पैसे दिले जात असताना शेतकऱ्यांकडून खुशालीच्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याचे म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, धनाजी चुरमुंगे, धनाजी पाटील, राजेश पाटील, नारायण थोरवत, बजरंग अवघडे, प्रताप चव्हाण, भैरवनाथ मगदूम, शिवाजी शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
फोटो नं १८०१२०२१-कोल-जय शिवराय निवेदन
ओळ : ‘लोकमत’मधील ‘खंडणी की खुशाली’ या वृत्त मालिकेची दखल घेत सोमवारी कोल्हापुरातील जय शिवराय किसान संघटना व आंदाेलन अंकुश यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले.
--