विधवासंबंधी अनिष्ट प्रथा बंद करणार
By admin | Published: June 28, 2015 11:48 PM2015-06-28T23:48:15+5:302015-06-28T23:48:15+5:30
स्वावलंबी बनविण्याचा उद्देश : विधवाश्रम विधवा संघटनेच्या मेळाव्यात निर्धार
कोल्हापूर : विधवांना अन्यायाची वागणूक देणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार विधवाश्रम विधवा संघटनेच्या मेळाव्यात रविवारी घेण्यात आला. गंगावेश येथील सत्यशोधक समाजाच्या हॉलमधील या मेळाव्यात ‘जगा आणि सन्मानाने जगू द्या,’ ‘कमवा आणि जगा’ या दोन तत्त्वांवर संघटनेच्या कार्याची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
विधवांनी हिरवी साडी, हिरवी कांकणे वापरायची नाहीत. केसांमध्ये फूल घालायचे नाही, अशा अनेक अनिष्ट प्रथा अजूनही समाजात सुरू आहेत. त्यांना अन्यायाची वागणूक देणाऱ्या प्रथा का आणि कशासाठी सुरू करण्यात आल्या, याची माहिती कोणालाही नाही. त्यामुळे अशा प्रथा बंद करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.
विधवांनी स्वावलंबी बनावे यासाठी ‘कमवा व जगा’ असा उद्देश नजरेसमोर ठेवून छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय सुरू करणे; साक्षर विधवांना नोकरी, रोजगार उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. विधवा संघटनेकडून बोलतोय असे म्हणण्याऐवजी ‘जय सावित्री’ म्हणायचे आणि हेच संघटनेचे घोषवाक्य राहील, असे सर्वांनुमते ठरल्याची माहिती मेळाव्याचे अध्यक्ष बाळ घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली.
या मेळाव्यास नितीन शेळके, सुभाष देसाई, शाम आडुरकर, राजू सावंत, गजानन लिंगम, अर्चना पांढरे, कुसुम देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)