वीज बिल वसुली थांबवा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:09+5:302021-07-07T04:29:09+5:30
जयसिंगपूर : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...
जयसिंगपूर : कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशातच विद्युत वितरण कंपनीकडून वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीज बिल न दिल्यास कनेक्शन कट करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्यावतीने जयसिंगपूर महावितरणला देण्यात आला.
महावितरण कंपनीकडून जी चुकीच्या पद्धतीने वसुली सुरु आहे, ती त्वरित थांबविण्यात यावी. कोरोनामुळे नागरिकांच्या हातामध्ये पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या वसुलीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत. ही वसुली तत्काळ थांबवावी, अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदनावर राहुल गोरे, श्रीकांत सुतार, अभिनंदन पाटील, नीलेश भिसे, कुमार पुदाले, सिंधुताई शिंदे, अमित पाटील, सचिन चकोते, शकुंतला कांबळे, वैशाली पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो - ०५०७२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - जयसिंगपूर महावितरणला मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले.