औरवाड येथे रास्ता रोको

By Admin | Published: February 17, 2015 12:10 AM2015-02-17T00:10:26+5:302015-02-17T00:11:32+5:30

रस्त्यासाठी आंदोलन : औरवाड, गणेशवाडीसह सात गावांतील ग्रामस्थ आक्रमक

Stop the road at Aurwad | औरवाड येथे रास्ता रोको

औरवाड येथे रास्ता रोको

googlenewsNext

बुबनाळ : शिरोळ तालुक्यातील औरवाड ते गणेशवाडी व आलास ते औरवाड हे आंतरराज्य जोडणारे दोन्ही रस्ते मजबूत करावेत, या मागणीसाठी औरवाड-नृसिंहवाडी पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गणेशवाडी, औरवाडसह सात गावांतील नागरिकांनी आंदोलनात भाग घेतल्यामुळे दोन तासांहून अधिक काळ या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. औरवाड ते गणेशवाडी व आलास ते औरवाड हे दोन मुख्य रस्ते दोन राज्यांना जोडणारे आहेत. यामुळे या रस्त्यांवरून कर्नाटकातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून कर्नाटकात अशा मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र हे दोन्ही रस्ते कायमस्वरूपी खड्डामय होतात. पावसाळ्यात रस्त्यांची मोठी दुरवस्था बनते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनधारक मेटाकुटीस आले आहेत. शिवाय या रस्त्यांवरून क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे रस्ते खचतात. हे दोन्ही रस्ते पक्के व मजबूत करावेत, या मागणीसाठी सोमवारी सकाळी औरवाड येथील नवीन व जुन्या पुलाजवळ बुबनाळसह आलास, औरवाड, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी या सात गावांतील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. तहसीलदार सचिन गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे. सी. बागवान आंदोलनस्थळी आल्यानंतर बागवान यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. तहसीलदार गिरी, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके व सप्तकृषी विकास समिती यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर निवेदन देण्यात आले.
आंदोलनात प्रकाश पाटील, योगेश जगताप, फय्याज गवंडी, संजय शिंदे, औरवाडचे उपसरपंच शपी पटेल, अफसर पटेल, दादेपाशा पटेल, अस्मल मुल्ला, गजानन वंटे, महेश देवताळे, सुनील संकपाळ, विजय कोळी, कैलास लाड यांच्यासह सात गावांतील ग्रामस्थ सहभागी झाले होते. दरम्यान, आजचे आंदोलन जनजागृती व शासनाला इशारा देण्यासाठी करण्यात आले. येत्या दीड महिन्यात मजबूत व पक्का रस्ता होण्यासाठी निधी मंजूर झाला नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: Stop the road at Aurwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.