खराब रस्त्यांविरोधी वाहनधारक महासंघाचा ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:21 PM2019-11-14T13:21:32+5:302019-11-14T13:23:38+5:30
कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नेहमी गजबजलेल्या दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नेहमी गजबजलेल्या दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेवेळी महापालिकेच्या इमारतीस रिक्षा व इतर वाहनांनी घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे आणि कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी केले. आंदोलनात विविध १५ हून अधिक वाहनधारक संघटनांनी सहभाग घेतला.
कोल्हापूर शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक बेजार झाले आहेत. परतीच्या पावसानंतरही रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले; पण ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचे पाऊल कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने उचलले आहे. त्यासाठी महासंघातर्फे बुधवारी दुपारी स्टेशन रोडवरील दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करून महापालिकेच्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
नेहमी गजबजलेल्या चौकात रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. पोलीस प्रशासनाने तातडीने आंदोलनात हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला.
यातूनही महापालिकेने कोणतेही पाऊल न उचलल्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी सभेचे कामकाज संपेपर्यंत महापालिकेच्या मुख्य इमारतीस रिक्षा व इतर वाहनांसह घेरावा घालणार, त्यातून शहरातील रस्ते करण्यासाठी महापालिकेस भाग पाडणार असल्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष अभिषेक देवणे, जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, राजू जाधव, दिलीप सूर्यवंशी, अशोक जाधव, इंद्रजित आडसूळ, नीलेश हंकारे, भारत चव्हाण, दिन महंमद शेख, रियाज जमादार, धनाजी यादव, काका मोहिते, विजय जेधे, तानाजी पाटील, शामराव पाटील, सुरेश पंदारे, संजय पाटील, वसंत पाटील, पुष्पक पाटील, पोपट रेडेकर, आदींचा समावेश होता.
आंदोलनात संघटनांचा सहभाग
महाराष्ट्र वाहतूक सेना, जिल्हा वाहनधारक महासंघ, भाजप रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा मालक सेना, रिक्षा चालक सेना, काळी-पिवळी टॅक्सी युनियन, टेम्पो ट्रॅव्हलर संघटना, अॅपे रिक्षा संघटना, मिनीडोअर आॅटो रिक्षा संघटना, जिल्हा वाहनधारक महासंघ, मिनीडोअर सहा सीटर संघटना, टॅक्सी युनियन, रिक्षा सेना, आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते.