आक्षेपार्ह मजकूराच्या पुस्तकांची विक्री थांबवा, शिवाजी विद्यापीठाची फडके बुक हाऊसला सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 07:33 PM2021-03-04T19:33:21+5:302021-03-04T19:36:37+5:30
Shivaji University Kolhapur- छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत. त्यांची विक्री तात्काळ थांबवावी, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने गुरूवारी फडके बुक हाऊसला केली. बी. ए. अभ्यासक्रमातील इतिहास विषयाची पुस्तके यापुढे विद्यापीठाने प्रकाशित करावी, अशी शिफारस इतिहास विषयाच्या अभ्यासमंडळाने केली.
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत. त्यांची विक्री तात्काळ थांबवावी, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने गुरूवारी फडके बुक हाऊसला केली. बी. ए. अभ्यासक्रमातील इतिहास विषयाची पुस्तके यापुढे विद्यापीठाने प्रकाशित करावी, अशी शिफारस इतिहास विषयाच्या अभ्यासमंडळाने केली.
फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या बी. ए. भाग तीन (सेमिस्टर पाच) मराठ्यांचा राजकीय इतिहास या पुस्तकावर आधारित इतिहास सुपर गाईडसह अन्य दोन विषयाच्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली. त्यासह या बुक हाऊसवर कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबतची कारवाई करण्याची मागणी केली. त्या
नंतर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांनी या बुक हाऊसला सूचना करणारे पत्र पाठविले. फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाल्याची बाब अतिशय गंभीर आहे. या पुस्तकांमध्ये विद्यापीठाच्या नावाचा उपयोग करण्याकरिता विद्यापीठाची कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर आणि विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत आणि त्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात यावी.
यापुढे विद्यापीठाच्या नावाचा वापर करून महापुरूषांची बदनामी होईल असा कोणताही मजकूर छपाई करण्यात येणार नाही. याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यासंदर्भात केलेली कार्यवाही तात्काळ विद्यापीठ कार्यालयाला कळविण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठात अभ्यासमंडळाची बैठक झाली. त्यात संबंधित सर्व पुस्तके प्रकाशकांनी मागे घ्यावीत. इतिहास अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यापीठाने प्रकाशित करावीत, अशी शिफारस या मंडळाने विद्यापीठाला केली.