बुबनाळमध्ये विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By admin | Published: January 7, 2015 11:50 PM2015-01-07T23:50:49+5:302015-01-07T23:51:35+5:30
अनियमित एस.टी. : विद्यार्थी आक्रमक; आश्वासनानंतर आंदोलन मागे
बुबनाळ : परीक्षेच्या तोंडावरच अनियमित एस.टी. बस येत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आज, बुधवारी सकाळी कुमार विद्यामंदिर शाळेसमोर एस.टी. अडवून रास्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी आलेल्या आगार व्यवस्थापकास विद्यार्थ्यांनी धारेवर धरले. अखेर तीन तासांहून अधिक काळ झालेल्या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
बुबनाळ-आलास मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून सकाळी नऊ वाजेपर्यंतच तीन बसेस येतात. त्यानंतर रात्रीपर्यंत एकही बस नियमित येत नाही. रात्री मुक्कामाची बस येत नाही. ती सकाळी येते व उशिरा सुटते. याबाबत ग्रामपंचायतीने २२ नोव्हेंबर २०१४ रोजी राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर यांना लेखी पत्रव्यवहार करून प्रवाशाचे तसेच विशेष करून विद्यार्थ्यांचे होणारे हाल व नुकसानाबद्दल प्रत्यक्ष भेटून बससेवा सुरळीत नसलेबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी होणाऱ्या गैरसोयीवरून बस अडवून रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासने देवून ग्रामस्थांची बोळवण केली. त्यानंतर अनियमित बस सेवा सुरूच आहे. ऐन परीक्षेच्या काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल संतप्त विद्यार्थ्यांनी आज, बुधवारी सकाळी आठच्या सुमारस कुरुंदवाड आगाराची जयसिंगपूर-आलास बस रोखून धरली व रास्ता रोेको आंदोलन सुरू केले.
दरम्यान, अचानक घडलेल्या आंदोलनामुळे वाहक व चालकांनी तत्काळ आगाराशी संपर्क साधून माहिती दिली. आगार व्यवस्थापक महादेव भंडारी व पट्टेकरी यांना विद्यार्थ्यांनी प्रश्नांचा भडिमार करून धारेवर धरले. यावेळी व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.