माळवींची पाठराखण थांबवा तरच ‘गोकुळ’साठी पाठिंबा

By admin | Published: March 22, 2015 01:02 AM2015-03-22T01:02:19+5:302015-03-22T01:13:55+5:30

महापालिका राजकारणाचे पडसाद : मुश्रीफांनी महाडिकांना सुनावले

Stop supporting Malavi only if support for 'Gokul' | माळवींची पाठराखण थांबवा तरच ‘गोकुळ’साठी पाठिंबा

माळवींची पाठराखण थांबवा तरच ‘गोकुळ’साठी पाठिंबा

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (‘गोकुळ’) होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व आमदार महादेवराव महाडिक यांच्यात शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर भेट झाली. या दोन प्रमुख नेत्यांत बंद खोलीत सुमारे पाऊण तास चर्चा झाली. महाडिक गटाने महापालिकेत महापौर तृप्ती माळवी यांची पाठराखण करण्याचे थांबवावे, तरच गोकुळच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
गेल्याच आठवड्यात महाडिक यांनी कारभाऱ्यांना आवरावे, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला होता. त्यावेळी महाडिक यांनी आपण स्वत:हून मुश्रीफ यांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही भेट झाली. ज्येष्ठ संचालक रणजित पाटील यांनी ही भेट घडवून आणली. यावेळी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास नारायण पाटील, आदी उपस्थित होते.
मुश्रीफ व महाडिक यांनी सुमारे पाऊण तास बंद खोलीत चर्चा झाली. ही भेट व चर्चा महापौरांचा राजीनामा व गोकुळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तारुढ गटास पाठिंबा यासंदर्भातील होती, असे सांगण्यात आले. चर्चेवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपल्यासोबत राहावे, असे आवाहन आमदार महाडिक यांनी केले. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही नेत्यांनी परस्परांना राजकीय भूमिकेबध्दल अंदाज दिला नाही. महापौरांनी ठरावाविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यात आता महाडिक गटाची काही भूमिका राहिलेली नाही. तिकडे राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांना गोकुळसाठी अर्ज भरा म्हणून सांगितले असल्याने त्यातून आता माघार घेणे पक्षाच्या नेत्यांनाही अवघड आहे. आता एकदा रणांगण पेटल्यावर ते विझवणे अवघड आहे. जरी ते विझवले तरी धुमसत राहणारच अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर ज्येष्ठ संचालकांनी व्यक्त केली. यापूर्वी मुश्रीफ व माजी मंत्री सतेज पाटील यांच्यातही पाठिंब्यासंदर्भात भेट व चर्चा झाली आहे. गोकुळसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. मंगळवारी छाननी असून त्यामध्ये किती जणांचे अर्ज वैध ठरतात त्यानंतरच राष्ट्रवादीची भूमिका निश्चित होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Stop supporting Malavi only if support for 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.