Kolhapur News: केडीसीसी बँक सामान्यांची, बदनामी थांबवा; शेतकरी, ठेवीदारांच्या शिष्टमंडळाची मागणी
By भीमगोंड देसाई | Published: February 23, 2023 03:17 PM2023-02-23T15:17:06+5:302023-02-23T15:18:11+5:30
परत आपणास चौकशी करण्याची आवश्यकता का भासली?
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) सर्वसामान्यांची आहे. राज्यातील जिल्हा बँकांच्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये या बँकेचा सामावेश आहे. बँकेचे कामकाज पारदर्शक आहे. यामुळे नाहक बँकेची बदनामी करू नका, अशा मागणीचे निवेदन शेतकरी, ठेवीदार, बँक संलग्न संस्था प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिले.
सकाळी त्यांनी प्रभारी सहनिबंधक अरुण काकडे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना निवदेन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, देशात जादा इन्कमटॅक्स भरणारी सहकारातील पहिली बँक आहे. बँकेतर्फे ७५ टक्के साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा केला जातो. जिल्हयातील १२ ते १५ लाख शेतकरी बँकेचे खातेदार आहेत.
दरम्यान, वारंवार बँकेवर होत असलेल्या आरोपामुळे बँकेची नाहक बदनामी होत आहे. जिल्हा बँकेस वेठीस धरुन नाहक बदनामी तसेच शेतकरी हवालदील होईल असे कोणतेही धोरण आपणाकडून होवू नये.
निवेदन देताना बाबासाहेब देवकर, विलास पाटील, रामचंद्र मोहिते, विश्वनाथ कुंभार, पंडितराव केणे, मधुकर जांभळे, मधुकर देसाई, के. एन. पाटील, शिवाजीराव देसाई, गोविंद मेटील, दिलीप सावंत, रंगराव कोळी, सुरेश पाटील, अनिल चोपडे, राजाराम कासार, नवल बोते, संभाजी पवार, विश्वासराव इंगवले आदी शेतकरी उपस्थित होते.
चौकशीची गरज का ?
बँकेत सर्वच राजकीय पक्षांचे संचालक आहेत. रिझर्व्ह बँक, नाबार्ड, सहकार खाते, राज्य बँक यांच्या धोरणानुसार बँकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने चालू आहे. बँकेस ६ ते ७ वर्षे ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे. बँकचे कामकाज पारदर्शी आहे. बँकेवर खोटेनाटे आरोप करून नका. काही दिवसांपूर्वी बँकेची ईडीमार्फत चौकशी केली. परत आपणास चौकशी करण्याची आवश्यकता का भासली ? असा प्रश्नही निवेदनातून विचारण्यात आला.