कोल्हापूर-बेंगळुरु महामार्गावरील टोलवसुली बंद करा, चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:08 IST2025-03-19T12:07:36+5:302025-03-19T12:08:07+5:30
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

कोल्हापूर-बेंगळुरु महामार्गावरील टोलवसुली बंद करा, चंद्रदीप नरके यांची अधिवेशनात मागणी
कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके यांनी मंगळवारी विधानसभा अधिवेशनात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या सहापदरीकरण कामाचा मुद्दा उचलून धरला. कामे अपूर्ण आणि असुविधापूर्ण सेवारस्ते यामुळे टोलवसुलीच बंद करण्याची मागणी त्यांनी केली. ‘लोकमत’ने तीन दिवसांची मालिका लिहून या रेंगाळलेल्या कामाचा प्रश्न ऐरणीवर आणला होता.
ते म्हणाले पुणे-बंगळुरु या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे सहापदरीकरणाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण होत आहे. परिणामी पुणे ते कोल्हापूर प्रवासाला सहा तास लागत आहेत. याचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. काम सुरू असल्याने नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधा या मार्गावर उपलब्ध केल्या जात नाहीत. मग या मार्गावर टोलवसुली का केली जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचप्रमाणे रत्नागिरी-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादनासाठी पूर्वी चारपट रक्कम दिली जात होती. मात्र, नव्या नियमानुसार आता शेतकऱ्यांना फक्त दुप्पट रक्कम दिली जात आहे, हे थांबवून पूर्वीप्रमाणे चारपट रक्कम द्यावी, याच मार्गावर केर्ले-पडळवाडी रस्ता सोडून होणाऱ्या बायपासला निधी मिळावा, कोल्हापूर येथे प्रस्तावित खंडपीठाचा विषय तत्काळ मार्गी लावून पाच जिल्ह्यांतील नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या जमिनी सुपीक आहेत.
त्यामुळे तुटपुंज्या नुकसानभरपाईवर या जमिनी अधिग्रहित करणे अवघड जाईल, कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागासाठी निर्माण केलेल्या नागरी विकास प्राधिकरणाला निधी दिला गेला नाही, यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावून या प्राधिकरणासाठी निधीची तरतूद करावी, अशा मागण्या नरके यांनी केल्या.