पंकजा मुंडेंच्या राजीनाम्यासाठी रास्ता रोको
By admin | Published: June 28, 2015 12:49 AM2015-06-28T00:49:19+5:302015-06-28T00:53:18+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन : पुणे-बंगलोर महामार्ग रोखला; राजीनामा देईपर्यंत आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : तीन लाखांवरील खरेदीसाठी ई-टेंडर काढण्याचे निर्देश आहेत. परंतु, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी एका दिवसात २४ अद्यादेश काढून विशिष्ट कंपनीला २०६ कोटी रुपयांचा ठेका मंजूर केला. एक प्रकारे हा भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे, असा आरोप करीत त्यांनी नैतिकता जपत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने शनिवारी तावडे हॉटेलजवळ पुणे-बंगलोर महामार्ग रोखला. मुंडेंसह सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत कार्यकर्त्यांनी तब्बल एक तास महामार्ग रोखून धरला.
सकाळी साडेदहापासून राष्ट्रवादी कॉँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झाली. साडेअकराच्या सुमारास माजी कामगारमंत्री, आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक या ठिकाणी आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून दोन्ही बाजंूचा महामार्ग रोखून धरला.
‘ताईची चिक्की गोरगरिबांना बुक्की’...‘राजीनामा द्या...राजीनामा द्या...पंकजाताई राजीनामा द्या...’ ‘गरिबांना लुटणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो...’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. जोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस पंकजा मुंडेंचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हसन मुश्रीफ म्हणाले, मंत्री पंकजा मुंडे यांनी २०६ कोटींचा ठेका मंजूर करून गैरव्यवहार केला आहे. अहमदनगरमध्ये आदिवासी मुलांना वाटलेल्या चिक्कीत ब्लेड व काचेचे तुकडे आढळल्याने त्यांच्या जिवाशी मुंडेंनी खेळ केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याने त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शी कारभाराचे पितळ उघडे पडले असून, भ्रष्टाचारात त्यांचाही वाटा असल्याचा संशय येत आहे.
खासदार महाडिक म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त म्हणणाऱ्या भाजप सरकारचा एक वर्षातच पर्दाफाश झाला आहे. केंद्रासह राज्यात अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले आहेत. टेंडर न काढता ठेका मंजूर करणाऱ्या मंत्री मुंडे यांनी नैतिकता जपत राजीनामा द्यावा. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या केंद्रातील मंत्र्यांच्याविरोधात येत्या संसदीय अधिवेशतान आवाज उठवू.
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे मंत्री मुंडे यांच्या कारभाराची चौकशी करावी. जोपर्यंत या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. यावेळी ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार, ‘राष्ट्रवादी युवक’चे शहराध्यक्ष आदिल फरास, करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील यांचे भाषण झाले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजू लाटकर, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस’चे जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील-भुयेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, आर. के. पोवार, अनिल साळोखे, किसन कल्याणकर, मधुकर जांभळे, अमित पाटील, नितीन जांभळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)