‘स्वाभिमानी’कडून रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:02 AM2019-01-14T01:02:27+5:302019-01-14T01:02:31+5:30
कुरुंदवाड : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम न देता केवळ २३०० रुपये पहिली उचल दिल्याने संतप्त स्वाभिमानी संघटनेने ...
कुरुंदवाड : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम न देता केवळ २३०० रुपये पहिली उचल दिल्याने संतप्त स्वाभिमानी संघटनेने नृसिंहवाडी-कुरुंदवाड रस्त्यावरील शिवतीर्थ येथे रविवारी सकाळी रास्ता रोको केला. आंदोलनामुळे वाहतुकीची एक तासाहून अधिक काळ कोंडी झाली होती. मात्र, शेतातून तुटलेला ऊस कारखान्यास जाऊ देण्याचे आदेश खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ेचालू हंगामातील गळितास गेलेल्या उसाला २३०० रुपये पहिली उचल दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वाभिमानी संघटनेने शनिवारी शहरातील सर्वच साखर कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकले होते. त्यामुळे वादावादीतून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारच्या आंदोलनानंतरदेखील ऊस वाहतूक सुरूच राहिल्याने स्वाभिमानी संघटनेचे आण्णासो चौगुले, बंडू उमडाळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला.
ऊस वाहतुकीच्या वाहनाबरोबर सर्वच वाहने अडविल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सध्या तुटलेला ऊस कारखान्यास गाळपास पाठविण्यास खासदार शेट्टी यांनी परवानगी दिल्याने आंदोलन मागे घेतले. आंदोलनात दत्ता गुरव, योगेश जिवाजे, रघू नाईक, शांतीनाथ भबिरे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.