गाभाऱ्यात जाणाऱ्या महिलांना रोखले
By admin | Published: April 5, 2016 01:12 AM2016-04-05T01:12:59+5:302016-04-05T01:12:59+5:30
अंबाबाई मंदिर : महिला भाविकांकडून धक्काबुक्की; पोलिसांचा हस्तक्षेप
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाऊ पाहणाऱ्या अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले यांच्यासह पंचवीसहून अधिक महिलांना सोमवारी सकाळी महिला भक्तांनीच रोखून धरत पिटाळून लावले. यावेळी एकमेकींना धक्काबुक्की झाल्याने काही काळ मंदिरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गोंधळ झाल्याने पोलिसांनी सर्वच महिलांना मंदिरातून बाहेर काढले.
शनिशिंगणापूर येथील शनि चौथऱ्याच्या दर्शनावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आंदोलनाच्या व नुकत्याच उच्च न्यायालयाच्या स्त्री-पुरुष समान दर्शन हक्काच्या मुद्द्यावर कोल्हापुरातील ‘अवनि’ संस्थेच्या अनुराधा भोसले यांच्यासह पंचवीसहून अधिक महिलांनी सोमवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीची ओटी भरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या महिला भक्तांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. यावेळी आंदोलनकर्त्या महिला व महिला भक्तांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर आंदोलनकर्त्या महिलांनी गाभाऱ्यात जाण्याचा जोरदार प्रयत्न केला. हा प्रयत्न हाणून पाडताना आंदोलनकर्त्या महिला व महिला भक्त यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ पितळी उंबऱ्याआतील बाजू व गाभाऱ्याजवळील उंबऱ्याजवळ मोठा गोंधळ उडाला. वातावरण गंभीर होऊ लागल्याने पोलिसांनी या दोन्ही बाजूच्या महिलांना मंदिरातून बाहेर काढले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी काही काळ शनि मंदिरासमोर ठिय्या मारला. यावेळी महिलांमध्ये बैठक झाली. त्यानुसार धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरोधात पोलिसांत तक्रार देण्याचे ठरले. त्याप्रमाणे अनुराधा भोसले यांच्यासह सर्व आंदोलक महिला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेल्या तेथे पोलिसांनी भोसले यांना ‘तुमच्या आंदोलनामुळे काही काळ गोंधळ झाल्याने भाविकांचे दर्शन खोळंबले’, अशी नोटीस पोलिसांनी बजावली तर भोसले यांनी गाभाऱ्यात प्रवेशास मज्जाव व धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करा, अशी तक्रार दिली. याबाबतही पोलिसांनी या महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलनकर्त्या महिला श्रीपूजकांचे प्रतिनिधी व मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. या आंदोलनात जयश्री कांबळे, वनिता कांबळे, मनिषा पोटे, अमृता पाटील, पुष्पा पठारे, अमिता भोसले, पुष्पा कांबळे, फ्रान्सीसा डिसुझा, आसावरी माळकर, अनुराधा तेंडुलकर आदींनी सहभाग घेतला.