इचलकरंजीत कर्मचाऱ्यांचे काम बंद

By Admin | Published: December 29, 2015 12:56 AM2015-12-29T00:56:14+5:302015-12-29T01:04:11+5:30

नगरपालिकेत आंदोलन : नोव्हेंबरचा पगार न मिळाल्याने निषेध, घोषणाबाजी

Stop the work of Ichalkaranji | इचलकरंजीत कर्मचाऱ्यांचे काम बंद

इचलकरंजीत कर्मचाऱ्यांचे काम बंद

googlenewsNext

इचलकरंजी : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी नोव्हेंबर महिन्याचा पगार न मिळाल्याने सोमवारी काम बंद आंदोलन केले. सकाळी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र जमून प्रवेशद्वार बंद केले. यावेळी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून पगार देण्यास मंजुरी मिळाल्यावर त्वरित पगार देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कामगारांनी खात्यावर पगार जमा होईपर्यंत काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते.
कर्मचाऱ्यांना अलीकडे प्रत्येक महिन्याला पगारासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा लागत आहे. पाठपुरावा करूनही नोव्हेंबर महिन्याचा पगार न मिळाल्याने सोमवारी संतप्त झालेले कर्मचारी पगाराच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन करीत मुख्य प्रवेशद्वारात जमले. प्रवेशद्वार बंद करून कामगार लोकप्रतिनिधी, नागरिकांना पालिकेत जाण्यापासून रोखले. यावेळी वेळेवर पगार न देणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सुमारे अर्धा तासाच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे आणि मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी, शासनाकडून पगारासाठी निधी आला आहे; मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला मंजुरी मिळाली नाही. मंजुरीनंतर त्वरित पगार देण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. मात्र, कामगार नेत्यांनी प्रत्येक महिन्याला ही अडचण असून, कायमस्वरूपी १ तारखेला पगार होण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली. तसेच नोव्हेंबरचा पगार खात्यावर जमा होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला.
पगाराबाबत त्वरित निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्याधिकारी रसाळ कोल्हापूरला रवाना झाले. दरम्यान, रात्री उशिरा मुख्याधिकाऱ्यांना धनादेश प्राप्त झाला असून, आज, मंगळवारी पगार होणार असल्याचे मुख्याधिकारी रसाळ यांनी सांगितले. आंदोलनात कामगार नेते ए. बी. पाटील, संभाजी काटकर, शंकर अगसर, हरी माळी, अण्णासाहेब कागले यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले. (वार्ताहर)

कामकाज ठप्प : नागरिक मात्र त्रस्त
पगारासाठी कामगारांच्या आंदोलनामुळे पालिकेचे कामकाज दिवसभर ठप्प होते. चार दिवसांच्या सलग सुटीनंतर सोमवारी पालिका सुरू झाली. त्यामुळे तटलेली कामे करण्यासाठी नागरिक नगरपालिकेत येत होते. मात्र, काम बंद आंदोलनामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. या गैरसोयीमुळे नागरिक त्रस्त होऊन संताप व्यक्त करताना दिसत होते.

Web Title: Stop the work of Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.