‘सर्फनाला’चे काम बंद पाडले
By admin | Published: February 4, 2015 12:09 AM2015-02-04T00:09:59+5:302015-02-04T00:11:02+5:30
प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन : प्रश्न मार्गी न लागल्याचा आरोप
आजरा : अप्पर जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याशी पारपोली (ता. आजरा) येथील २१ जानेवारी २०१५ च्या बैठकीत झालेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणास्तव मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी सर्फनाला प्रकल्पाचे काम मंगळवारी बंद पाडले.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपत देसाई यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यावेळी देसाई म्हणाले, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध निर्णय झाले होते. शेळप गावठाणात ज्यांना भूखंडाचे वाटप झाले आहे, अशा प्रत्येक भूखंडधारकास शेळप येथील किमान एक एकर जमीन मिळाली नाही तर पूर्वीचे आदेश बदलून सर्वांना किमान एक एकर जमिनीचा आदेश तातडीने होण्याचे ठरले होते; पण असा आदेश झाला नाही.
आंबाडे गट नं. ८६ मधील प्रकल्पग्रस्तांचे गावठाण पसंदीचे व जमीन मागणी फॉर्म सादर झाल्यानंतर तातडीने वर्ग करून आदेश काढण्याचे ठरले होते. प्रत्यक्षात असे घडले नाही. यामुळे प्रशासनावर कितपत विश्वास ठेवायचा, हा प्रश्न आहे. शासकीय अधिकाऱ्यांकडून प्रकल्पग्रस्तांची थट्टा केल्याचा हा प्रकार आहे. प्रकल्पग्रस्त स्त्री-पुरुषांनी अखेर हे काम बंद पाडले. यावेळी पी. आर. पाटील, ज्ञानेश्वर गुंजाळ, मारुती ठोकरे, श्रीपती जाधव, हरिबा जाधव यांच्यासह ‘श्रमुद’चे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बैठकीत ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याचे काम टाळले जात आहे. आता कामे पूर्णत्वास जाण्यासाठी प्रकल्पाचे काम बंद करण्याशिवाय पर्याय नाही.
- संपत देसाई