पाण्यासाठी नदी अडवून जॅकवेलकडे वळविली
By admin | Published: February 7, 2016 09:01 PM2016-02-07T21:01:50+5:302016-02-08T00:48:26+5:30
म्हाकवेतील प्रकार : जॅकवेलच्या चुकीच्या उभारणीमुळे ग्रामपंचायतीचा खटाटोप
दत्तात्रय पाटील -- म्हाकवे --जॅकवेल कुठे असते? असा कोणत्याही शाळकरी मुलाला प्रश्न विचारला तरी तो बिनचूक उत्तर देईल की जॅकवेल नदीत असते. परंतु, म्हाकवे (ता. कागल) येथे जॅकवेलची जगावेगळी उभारणी केल्याने येथील जॅकवेल नदीत नसून, नदीच अडवून जॅकवेलमध्ये वळविण्यात आली आहे. सध्या काळम्मावाडी धरणातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे वेदगंगा नदीत पाणी सोडण्यावर प्रशासनाने नियंत्रण आणले आहे. त्याचा परिणाम म्हाकवेतील पाणीपुरवठ्यावर होत आहे. येथील जॅकवेल नदीकाठावर नदीतील पाणी पातळीपेक्षा उंचावर बांधण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात कच्चा बंधारा घालून पाणी अडवून ते जॅकवेलमध्ये आणले आहे. परंतु, कच्चा बंधारा आणि जॅकवेलची उंची पाहता यातूनही अपुरेच पाणी जॅकवेलमध्ये येत आहे. त्यामुळे नदीतील पाणी विद्युत पंपाद्वारे जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी ग्रामस्थांना हाच आर्थिक ओरखडे काढणारा पर्याय ग्रामपंचायतीसमोर उरला आहे.वेदगंगा नदीत पाणी कमी असल्याने गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना ग्रामपंचायतीची चांगलीच दमछाक होत आहे. त्यांना तारेवरची कसरत आणि उपद्व्याप करावा लागत आहे. सध्या गावाला दोन-तीन दिवसांतून नदीतून थेट उपसा पद्धतीनेच पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांना अशुद्ध, गाळमिश्रित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. याकडे एकाही अधिकाऱ्याने गांभीर्याने पाहिलेले नसून, डोळेझाकपणाच करण्यात धन्यता मानली आहे. सुमारे सात हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावात येथील लोकप्रतिनिधींनी गेल्या तीन दशकांमध्ये अनेक योजनांतून शासनाकडून निधी उपलब्ध करून पाणी योजना केल्या आहेत. परंतु, या पाणी योजनांतून ग्रामस्थांची तृष्णा भागविली जाते का, याचे भान
निधी देणाऱ्या आणि तो खर्च करणाऱ्यांना नाही.
म्हाकवेकरांना ‘गढूळाचे’च पाणी!
म्हाकवे गावच्या डाव्या-उजव्या बाजूला असणाऱ्या आणूर, कौलगे, बस्तवडे या गावांना एक-दोनच पाणी योजना झाल्या आहेत, तर या गावांचे जॅकवेलही याच नदीत सुमारे २५ ते ३० फूट खोलीवर आहे. त्यामुळे नदीला अपुरे पाणी असताना किंवा महापुराच्या काळातही येथे स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळते. मात्र, म्हाकवे येथे याच योजना होऊनही अपुरे आणि गढूळच पाणी मिळते, ही शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत.
‘आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी या पाणीयोजना झाल्या आहेत. गावचा पाणीप्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वच सदस्य समिती एकटवली असून, स्थानिक व वरिष्ठ लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांशी विचारविनिमय, बैठक सुरू असून, यासंदर्भात आम्ही लवकरच पर्यायी मार्ग काढू.’
- रमेश सिद्राम पाटील, उपसरपंच, म्हाकवे.