वादळाचा जोर कायम
By admin | Published: October 9, 2015 01:00 AM2015-10-09T01:00:23+5:302015-10-09T01:01:27+5:30
ट्रॉलर्सना ‘मालवण’चा ‘आधार’ : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती
मालवण : भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खोल समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बुधवारी रात्रीपासून वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग वाढल्याने मासेमारीसाठी आलेले कर्नाटक, केरळ व तमिळनाडू राज्यांतील १९ हायस्पीड ट्रॉलर्सनी सुरक्षेच्या दृष्टीने बुधवारी रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात मालवण बंदराचा आधार घेतला आहे. (पान १ वरून)
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परप्रांतीय हायस्पीड-पर्ससीन व विनापरवाना मिनी पर्ससीन ट्रॉलर्स आणि पारंपरिक मच्छिमार यांच्यात वादाची ठिणगी भडकली असल्याने पोलीस दलाला मिळालेल्या आदेशानुसार अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात या नौकांना मालवण बंदरात आश्रय देण्यात आला आहे. दरम्यान, समुद्री वादळाचा जोर येत्या ४८ तासात कायम राहण्याचा संदेश प्राप्त झाल्याने दोन दिवस या नौका मालवण बंदरातच आश्रय घेतील, अशी माहिती मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी गावडे यांनी दिली आहे. वादळी वाऱ्यांचा जोर कमी झाल्यानंतर या नौकांना सोडण्यात येणार आहे.
यात १९ ट्रॉलर्सपैकी तामिळनाडू येथील दोन, कर्नाटक येथील एक व केरळच्या १६ ट्रॉलर्सचा समावेश आहे. यातील १७ ट्रॉलर्स काल रात्री उशिरा तर दोन ट्रॉलर्स गुरुवारी सकाळी मालवण बंदरात दाखल झाले. (प्रतिनिधी)
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत पुणे येथील वेधशाळेचे हवामान तज्ञ दिनेश मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. केरळ, कर्नाटक भागात खोल समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गोवा, सिंधुदुर्गच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. येत्या ४८ तासात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यास समुद्रात वाऱ्यासह पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.
मासळीची लूट होण्याची भीती
परराज्यातील हे हायस्पीड ट्रॉलर्स आश्रयासाठी मालवणात आले आहेत. हे ट्रॉलर्स १२ नॉटीकल मैल राज्याच्या सागरी क्षेत्रात येऊन मासळीची लयलूट करतात. आता हे ट्रॉलर्स आमच्याकडे आले आहेत. त्यांना आश्रय देऊन त्यांची सुरक्षा करणे ही आम्हा पारंपरिक मच्छिमारांची जबाबदारी आहे.
मात्र, समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्यास सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदराचा आश्रय घेतला जातो, मग अशा स्थितीत या ट्रॉलर्र्सना मालवणात आश्रय दिला गेला आहे. वादळाच्या नावाखाली आश्रय घेऊन परतत असताना ट्रॉलर्सकडून मासळीची लयलूट केली जाण्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.