वादळ शमले... आता कार्यकर्त्यांकडून शेट्टींची मनधरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:08 AM2020-06-20T11:08:07+5:302020-06-20T11:54:42+5:30
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी घेण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांकडून बाहेर आलेली बंडाची तलवार शुक्रवारी पूर्णपणे म्यान झाली. प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभिमानीमध्ये दोन दिवसांपासून उठलेले हे वादळ पेल्यातीलच होते, हे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी घेण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांकडून बाहेर आलेली बंडाची तलवार शुक्रवारी पूर्णपणे म्यान झाली. प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभिमानीमध्ये दोन दिवसांपासून उठलेले हे वादळ पेल्यातीलच होते, हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शेट्टी यांनीच आमदार व्हावे, अशी राज्यभर मोहीम सुरू झाली असून कार्यकर्त्यांकडून शेट्टी यांच्या मनधरणीसाठी विविध मार्ग अवलंबले जात आहेत.
शेट्टी यांचे सर्वाधिक विश्वासू आणि जवळचे सहकारी असलेले प्रा. पाटील व मादनाईक यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेण्यावरून नाराजी व्यक्त करताना आपला उमेदवारीसाठी का विचार झाला नाही, अशी खंत व्यक्त केली होती.
यावरून शेतकरी संघटनेतील कलह राज्यभर पोहोचला होता. संघटना पुन्हा फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाटील व मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेऊन शेट्टी यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे; पण आता शेट्टी यांनीच उमेदवारी स्वीकारावी यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर आज, शनिवारी शेतातच आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी कार्यकर्त्यांची आज बैठक बोलावली आहे.
आता लक्ष शेट्टींच्या भूमिकेकडे
आपल्यालाच का उमेदवारी स्वीकारावी लागली याचा खुलासा फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आमदारकी नको अशी भूमिका घेत यावर प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. उमेदवारीवरून संघटनेत वाद नकोत म्हणून पाटील व मादनाईक यांनी नमते घेतले तरी शेट्टी यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे ते काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समाजमाध्यमांवर शेट्टींचेच वारे
संघटनेतूनच विरोध झाल्याने व्यथित झालेले शेट्टी यांनी ह्यआमदारकीची ब्याद नको,ह्ण असे जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. समाजमाध्यमांवर शेट्टी समर्थकांचेच वारे वाहू लागले असून, आमदारकी स्वीकारा नाही तर पदांचे सामूहिक राजीनामे देऊ, घरासमोर येऊन उपोषणाला बसू असे आर्जवही केले जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेट्टी सभागृहात हवेत, असे समर्थन करतानाच एक गट्टी - राजू शेट्टी असा नाराही पुन्हा एकदा घुमू लागला आहे. राज्यभरात कार्यकर्त्यांनी बैठकांचा धडाका लावला असून आमदारकी स्वीकारावी यासाठी जोरदार आग्रह धरला जात आहे.