‘थेट पाईपलाईन’वरून आजच्या सभेत वादळी चर्चा
By admin | Published: November 7, 2014 12:00 AM2014-11-07T00:00:39+5:302014-11-07T00:10:45+5:30
राजकीय संदर्भ बदलले : रोजंदारी कर्मचाऱ्यांंचेही सभेकडे लक्ष
कोल्हापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवारी होत आहे. पाचशेहून अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचा ठराव सभेत केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणानंतर प्रथमच होणाऱ्या या सभेत थेट पाईपलाईन योजनेवरून पुन्हा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर प्रथमच महापालिकेची ही सर्वसाधारण सभा होत आहे. यापूर्वीच्या दोनवेळा झालेल्या सभेत धोरणात्मक निर्णय होऊ शकले नाहीत. यामुळे या सभेत जागा भाड्याने देणे, राज्य शासनाच्या निर्णयाची सभागृहास माहिती देणे, नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी सभागृहाची मान्यता घेणे, आदी विषयांवर चर्चा व शिक्कामोर्तब होणार आहे.
न्यायालयाच्या दणक्यामुळे महापालिका प्रशासनाने १५३ कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची पत्रे दिली.
३१४ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्यासाठी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महापालिकेच्या प्रशासनावर विश्वास ठेवून ३५०हून अधिक रोजंदारी कर्मचारी न्यायालयात गेले नाहीत. आता यांसह सर्वच ५००पेक्षा अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने न्याय द्यावा, ही मागणी क र्मचाऱ्यांतून होत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणाचे सर्वच संदर्भ बदलले आहेत.
थेट पाईपलाईनच्या अंमलबजावणीवेळी नेत्यांनी व प्रशासनाने एकछत्री अंमल ठेवला. याचे पडसाद सभागृहापेक्षा सभागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात उमटले.
आता नव्या राजकीय संदर्भास उभारी मिळत असल्याने सभागृहातही थेट पाईपलाईनवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
फक्त स्टंट नको, निर्णय घ्या
महापालिकेच्या २८ जुलै २०१४ रोजीच्या सर्वसाधारण सभेत न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेत असतानाच २००० सालापूर्वी सेवेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना हाच न्याय लावत, कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या सर्वसाधारण सभेत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचा विषय पुन्हा चर्चेसाठी घेतला आहे. फक्त चर्चा करून ठराव करू नका, तर ठोस निर्णय घ्या, अशी मागणी या कर्मचाऱ्यांतून होत आहे.