कोल्हापुरातील शिरोळला वादळी पावसाने झोडपले, पिकांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:10 PM2023-03-17T13:10:37+5:302023-03-17T13:18:39+5:30

नुकसानीचा महसूल विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

Stormy rain lashed Shirol in Kolhapur, causing huge damage to crops | कोल्हापुरातील शिरोळला वादळी पावसाने झोडपले, पिकांचे मोठे नुकसान

छाया : सुभाष गुरव

googlenewsNext

शिरोळ/ कुरुंदवाड : शिरोळ तालुक्याला बुधवारी मध्यरात्री वादळी वारा व पावसाने झोडपून काढले. त्यामुळे काढणीला आलेली गहू, हरभरा, शाळू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे तेरवाड (ता. शिरोळ) येथील बसथांब्याजवळ असलेली पानटपरी उडून रस्त्यावर पडली होती, तर येथील शेतकऱ्यांची शेवगा झाडे उन्मळून पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

उन्हाची लाहीलाही होत असताना वातावरणात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी मध्यरात्री अचानक विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाने झोडपून काढले. ऊस पिकाला मानवणारा पाऊस असला तरी रात्रीच्या सुमारास पाऊस आल्याने गहू, हरभरा, शाळूची कापणी व मळणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे धान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेवगा शेंगांनी बहरलेली तेरवाड येथील बाळासो हलवाई या शेतकऱ्याची शेवगा झाडे पाऊस आणि वादळी वाऱ्याने उन्मळून जमीनदोस्त झाली आहेत.

त्यामुळे वर्षभर झाडे जगवून पीक काढणीच्या वेळेला झाडेच उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, तर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान, या नुकसानीचा महसूल विभागाकडून त्वरित पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
 

Web Title: Stormy rain lashed Shirol in Kolhapur, causing huge damage to crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.