कन्यागत महापर्वकाळ प्रारंभ समारंभाची सांगता
By admin | Published: August 14, 2016 12:55 AM2016-08-14T00:55:14+5:302016-08-14T01:00:04+5:30
पस्तीस तास पालखी मिरवणूक : सोहळा वर्षभर चालू राहणार
नृसिंहवाडी : तब्बल पस्तीस तासांच्या पालखी मिरवणुकीने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाळ प्रारंभाची धार्मिक वातावरणात दत्तगुरूंच्या जयघोषात सांगता झाली. हा सोहळा पुढे वर्षभर चालू राहणार असून, वर्षभर भाविक स्नानाचा लाभ घेणार आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजता चालू सालातील दुसरा उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. श्रावण महिना, शनिवार व कन्यागत पर्वणीच्या योगावर झालेल्या दक्षिणद्वार सोहळ्याचा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे, आमदार उल्हास पाटील, तहसीलदार सचिन गिरी यांच्यासह हजारो भाविकांनी दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेतला. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर बारा वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याची प्रारंभाची सुमारे पस्तीस तास चाललेल्या मिरवणुकीने व श्रींच्या महापूजेने सांगता झाली. शासनाबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, स्वयंसेवी संस्था, पुजारी मंडळी, ग्रामस्थ, ब्रह्मवृंद सेवेकरी, दत्तभक्तव देणगीदार, आदींच्या सहकार्याने कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याचा प्रारंभ सुनियोजितरीत्या संपन्न झाल्याचे दत्त देव संस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी, सचिव सोनू ऊर्फ संजय पुजारी, सरपंच अरुंधती जगदाळे व उपसरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले. शुक्रवारी (दि. १२) सकाळी दहा वाजता धार्मिक विधी संपल्यावर श्रींची उत्सवमूर्ती पालखीत विराजमान होऊन शुक्लतीर्थवरून मुख्य मंदिराकडे परत येण्यासाठी निघाली. आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई, फुलांच्या व रंगीबेरंगी वस्त्रांच्या पायघड्या, ब्रह्मवृंदांचे एकसुरात म्हटलेल्या आरत्या व पदे झांज व टाळांच्या धार्मिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. मिरवणुकीत दुतर्फा सुवासिनींनी श्रींना ओवाळले व आशीर्वाद घेतले. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास श्रींच्या पालखीचे मंदिरात आगमन झाले. इंदुकोटी स्तोत्र आणि आरतीने पालखी सोहळ्याची सांगता झाली. यांनतर श्रींची पालखी प. पू. नारायण स्वामी महाराज मंदिरात श्रींची उत्सवमूर्ती मानकरी दिगंबर खातेदार यांनी नेली. प्रार्थना झाल्यावर श्रींची महापूजा उमेश खातेदार यांनी केली. महापूजेनंतर धूप, दीप, आरती व इंदुकोटी स्तोत्र पठण, आदी धार्मिक कार्यक्रम होऊन शेजारती करण्यात आली. कन्यागत पर्व प्रारंभ संपन्न होण्यासाठी विश्वस्त विवेक विष्णू पुजारी, दामोदर गोपाळ संतपुजारी, राजेश खोंबारे, महादेव वसंत पुजारी, सोमनाथ वसंत काळूपुजारी, शशिकांत कल्याण बड्डपुजारी, विपूल हावळे, मंगेश पुजारी, आदी विश्वस्तांनी परिश्रम घेतले. शनिवारी दुपारी तीन वाजता येथील दत्त मंदिरात चालू वर्षातील दुसरा उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे, आमदार उल्हास पाटील, तहसीलदार सचिन गिरी यांच्यासह हजारो भाविकांनी दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेतला. दत्त देव संस्थान व आपत्ती व्यवस्थापन यांनी भाविकांच्या स्नानासाठी यांत्रिक बोटी, आपतकालीन पथके, स्वयंसेवक, पट्टीचे पोहणारे आदींची व्यवस्था केली होती. भाविकांचे स्नान सुलभ होण्यासाठी विश्वस्त शशिकांत बड्डपुजारी, सोमनाथ पुजारी, मंगेश पुजारी, लिपिक प्रशांत कोडणीकर यांनी नियोजन केले. (वार्ताहर) दक्षिणद्वार सोहळा : भाविकांसह अधिकाऱ्यांचेही स्नान कृष्णा-पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील दुसरा उतरता दक्षिणद्वार सोहळा झाला. पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी कन्यागत महापर्वकाळनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शुक्रवारी (दि. १२) स्नानाचा लाभ घेतला.