कहाणी माणसाळलेल्या कावळ्याची, पोर्ले तर्फ ठाणेचा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:39 PM2018-04-09T16:39:23+5:302018-04-09T16:39:23+5:30
तो त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो आणि त्यांनेच अन्नाचे घास चारले तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. ही कहाणी माणसाळलेल्या कावळ्याची आहे.पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील युवराज शेवाळे या पशुपक्ष्यांशी ऋणानुबंध जोडणाऱ्या अवलियाची.
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे (कोल्हापूर) : तो त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो आणि त्यांनेच अन्नाचे घास चारले तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. ही कहाणी माणसाळलेल्या कावळ्याची आहे.पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील युवराज शेवाळे या पशुपक्ष्यांशी ऋणानुबंध जोडणाऱ्या अवलियाची.
झाडाची फांदी तोडल्यामुळे मायेच्या उबेला पोरकी झालेल्या कावळ्याच्या पिलांना, त्यांन सजीवातील माणूसकी दाखवत घरी आणलं. त्या पिलांचे पोटच्या पोरासारख संगोपन केलं; पण तिघा भावंडापैकी दोघाजणांनी पंख फुटल्यावर आकाशात भरारी घेऊन आपल्या दुनियेत निघून गेलीत. तर एकाने त्याच्यात देवपण ओळखल्याने, तो त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो.
माणसाला आवड किंवा छंद कधीच स्वस्त बसू देत नाही.लहाणपणापासून पशूपक्ष्याबाबत ओढ असणाऱ्या युवराजने खाजगी नोकरी सोडून प्रपंच्यासाठी पशुपालन सोबत पक्षी संगोपन करत आहे. युवराजच्या मनावर संसारांचा कितीही ताण असला तरी कावळ्याच्या सानिध्यात गेल्यानंतर युवराजला समाधान मिळते.दोघांना एकमेकांची भाषा समजत नसली तरी हावभावातून जिव्हाळ्याचे संबंध आणखी घट्ट होताना दिसत आहे.
दोन महिन्यापूर्वी युवराज कोल्हापूरहून गावाकडे येत होता. कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील चिखली फाट्याजवळ वडाच्या तुटलेल्या फांदीत कावळ्याच्या घरट्यात तीन पिल्लांचा मायेच्या उबेसाठीचा किलबिलाट ऐकून त्यांना घरी आणलं.
चोची वर करून भुकेसाठी व्याकूळ झालेल्या पिल्लांना बोटाने कावळ्याची चोच बनवून त्यांच्या पोटात अन्नाचा घास ढकलवा लागत होता.कावळ्याच्या पिल्लांना कुटूंबातील सदस्याप्रमाणे संगोपन करण्यात शेवाळे कुटूंब वेळ देत होते. बघताबघता दोन महिन्यात कावळ्याची पिल्लं मोठी झाली अन् पंख फूटलेने आकाशात गगन भरारी घेऊ लागली.
एक दिवशी तिनं कावळ्यांपैकी दोन कावळ्यांनी भावंडाला सोडून आपल्या जगात भूर्रकन उडून गेलेत;पण आपल्याला दिलेल्या मायेची जाणिव ठेवून त्यातील एक कावळा सध्या शेवाळे कुटूंबाचा अविभाज्य घटक बनून राहिला आहे. तो कावळा युवराजच्या हाताने अन्न खातो आणि दिवसरात्र परड्यातील झाडावर पाठीराख्या वास्तव्यास असतो.
त्याला बोलवलं की तो त्याच्या अंगाखांद्यावर बसतो, बागडतो. त्याच्याकडे कानाडोळा केला तर टोचून आपली भावना व्यक्त करतो. त्यांच्या परड्यात झाडाझूडपात या कावळ्यामुळे अनेक पक्षांचा वावर वाढला आहे.त्यामुळे शेवाळे कुटूंबात माणसाळलेल्या या कावळ्याचा विषय परिसरात कुतूहलाचा बनला आहे.
संगोपनासाठी युट्यूबचा वापर
मानवनिमित्त संकटामुळे मायेला पोरके झालेले कावळ्याची पिल्लं भूकेसाठी आकाशाकडे चोच करून किलबिलाट करायची.त्यांना अन्न कसे द्यायचे याबाबत युवराज अनभिज्ञत होता.म्हणून त्यांना अन्न पाणी कसे कोणत्या पध्दतीने द्यायचे यासाठी युट्यूब गुगलचा वापर केला.त्यामुळे कावळ्याच्या पिल्लाचे संगोपन करणे सोपस्कार झाले.
कावळ्याबाबत गैरसमजूती
माणसाच्या दशक्रिया विधी दिवशी कावळ्याने पिंडाला शिवले की माणसाचा आत्मा मुक्त होतो असे अनुभवी वास्तव आहे. तरी सुध्दा कावळ्यांचे घरावरती दंगा करणे,डोक्यावर कावळा बसणे अथवा चोचीने टोचणे, आकाशाकडे तोंड करून कावकाव करणे आशा अनेक प्रकारच्या कावळ्याच्या कृतीला अपशकुनतेची जोड दिली आहे;पण युवराजच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या कावळ्याच्या वास्तवतेने कावळ्याबाबतच्या अंधश्रद्धेला पूर्णविराम दिला आहे.