काळाचा क्षार म्हणून कथा टिकून राहील

By admin | Published: February 18, 2015 11:14 PM2015-02-18T23:14:40+5:302015-02-18T23:44:00+5:30

किरण गुरव यांचा विश्वास --थेट संवाद

The story will survive as a time alkali | काळाचा क्षार म्हणून कथा टिकून राहील

काळाचा क्षार म्हणून कथा टिकून राहील

Next

‘गवर’, ‘नभ उतरू आलं’, ‘राखीव सावल्यांचा खेळ’ यासारख्या कथा कष्टकरी स्त्रियांच्या आत्मभानाबद्दल विधान करू पाहतात. या कथांचे लेखक किरण गुरव यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : समकालीन मराठी कथा नवे रूप धारण करत आहे. अशा काळात तुमच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या साऱ्याकडे कसे पाहता ?
उत्तर : मराठी साहित्य जगतातल्या या उल्लेखनीय पुरस्कारामुळे मला थोडं सुख मिळालं परंतु कथा या साहित्य प्रकाराचा या सन्मानासाठी विचार होणं माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. समकालीन मराठी कथा नवं रूप धारण करतंय, हे फार आशादायक चित्र आहे. गेल्या कालखंडात कथा किंवा लघुकथा हा अगदी निकृष्ट दर्जाचा साहित्य प्रकार आहे, असे बोलले जात होते. गेल्या एक-दोन दशकांमध्ये समाजजीवनाला प्रयोगशाळेतल्या धगधगत्या दिव्यावर धरलेल्या काच नलिकेतील खदखदणाऱ्या द्रावणाचं रूप आलेलं आहे. त्यातील पांचट यथावकाश वाफ होऊन हवेत विरून जाईल. सर्वांतून तावून-सुलाखून निघालेली गंभीर कथा या काळाचा क्षार म्हणून टिकून राहील, असा मला विश्वास वाटतो.
प्रश्न : भूमी परिसराची एक अनाम ओढ तुमच्या कथांमध्ये आहे. ‘राखीव सावल्यांचा खेळ’ हा संग्रह तुम्ही आजीस व कपिलेश्वर गावास अर्पण केला आहे. तुमच्या घडणीवर या परिसराचा कोणता परिणाम झाला?
प्रश्न : बालपणीचा माझा बराचसा काळ कपिलेश्वर या छोट्याशा गावात आजोळी गेला. पुढं शिक्षणासाठी कोल्हापूर मग नोकरीला पुणे, गारगोटी परत कोल्हापूर अशी छोटीशी गरगर माझ्या आजपर्यंतच्या काळात आहे. लहान असताना सलग काही वर्षे आजोळी राहिल्याने आजी-आजोबांचा आणि वातावरणाचा, परिसराचाही माझ्यावर सखोल ठसा उमटलेला आहे. माझे आजी-आजोबा खूप प्रामाणिक, कष्टाळू आणि नेकदिल माणसं होती म्हणून ‘राखीव सावल्यांचा खेळ’ हा कथासंग्रह मी माझ्या आजीस व कपिलेश्वर या गावाला अर्पण केला आहे.
प्रश्न : मराठी ग्रामीण कथाकार आणि पूर्वसुरीतील लेखनपरंपरेतून कोणते प्रभावस्रोत तुमच्यापर्यंत आले आहेत?
उत्तर : मराठी ग्रामीण कथेकडून किंवा एकंदरित साहित्याकडून लिहिण्यासाठी आणि जगण्यासाठी मला भरपूर काही मिळाले आहे. चारूता सागर, सखा कलाल, माडगूळकर, पूर्वसूरीच्या कथाकारांनी माझ्यात हे भान निर्माण केलं आहे. याशिवाय भाऊ पाध्ये, मेघना पेठे यांच्या ‘नागर’ कथेनेही महानगर जीवनातील ताण-तणाव, पेच, प्रासंगिकता, भरगर्दीतला एकटेपणा यांच्याशी मला परिचित केलं आहे पण ‘ढव्ह’ आणि ‘लख्ख ऊन’, ‘रिवणावायली मुंगी’, ‘तिच्या वळणाची गोष्ट’ या राजन गवस यांच्या कथा या अर्धनागर समूहाच्या घडणीचा कथारूप उद्गार आहे असं मला वाटतं. समकाळाचं भान आणि आपल्या आजूबाजूच्या जीवनव्यवस्थेकडे बघण्याची एक नवी दृष्टी या कथांनी मला दिली आहे.
प्रश्न : अर्धनागर तालुकावजा गावाचा नव्या काळात वेगात घडणारे बदल तुम्ही संवेदनशीलतेने टिपलेले आहेत. याकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर : खेड्यात अमूक गल्ली, तमूक जातीचा वाडा हे टिकून असलं तरी आर्थिकदृष्टीने थोड्या सक्षम असलेले लोक त्याबाहेर पडले आहेत. हा बदल सकारात्मक आहेत. काही मर्यादेपर्यंत विज्ञान मानवी आयुष्य सुकर, सुरक्षित, स्वस्थ करतं ही गोष्ट खरी आहे तरीही बेकार आणि हताश तरुणांचे जथ्थे गावोगावी वाढतच आहेत. श्रीलिपी या कथासंग्रहात गावोगावी उपजिविकेसाठी वणवण करणाऱ्या अशा तरुणांचं प्रातिनिधीक चित्रण आहे.
प्रश्न : स्त्री चित्रणात तुमच्या कथेत एकाचवेळी शिवारातील व माजघरातले जग प्रभावीपणे आलेले आहे. ते कसे?
उत्तर : स्त्री-पुरुष विषमता खेड्या-पाड्यांमध्ये आपला प्रभाव टिकवून आहे. खेड्यातल्या स्त्रियांना थोडं आत्मभान होणं गरजेचे आहे. कारण आजही कुटुंबव्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेत तिचं स्थान शून्य असते. ‘गवर’, ‘नभ उतरू आलं’, ‘राखीव सावल्यांचा खेळ’ यासारख्या कथा या कष्टकरी स्त्रियांच्या आत्मभानाबद्दल कदाचित काही एक विधान करू पाहतात. मी ज्या पद्धतीचे स्त्री जीवन लहानपणांपासून पाहत आलेलो आहे त्याचीच ही रूपे आहेत.
प्रश्न : सध्या कोणत्या प्रकारच्या लेखनामध्ये गुंतलेला आहात ?
उत्तर : याचं होय किंवा नाही किंवा असंच काहीतरी उत्तर देणे हे खरं तांत्रिक स्वरूपाचे आहे असं मला वाटतं. कारण दररोजच्या जगण्यात गुप्त पोलिसासारखा आपल्यातला लेखक आपल्याला जाणवतो आणि त्याच्या नेहमी काहीतरी लिहित असतो. खरंतर लेखकाचं अवघं आयुष्य हीच एक लेखनपूरक बाब आहे की काय, असाही विनोदी संशय मला अधून-मधून येतो.
- रणधीर शिंदे

Web Title: The story will survive as a time alkali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.