एसटीपी ठेकेदार ‘विश्वा इंफ्रा’स ११ कोटींचा दंड
By admin | Published: June 17, 2016 12:08 AM2016-06-17T00:08:57+5:302016-06-17T00:21:55+5:30
स्थायी सभेत माहिती : देखभालीसाठी लवकरच नवी निविदा
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे (एसटीपी) काम वेळेत पूर्ण केलेले नाही, तसेच देखभालीचे कामही समाधानकारक नसल्याने या केंद्राचे ठेकेदार विश्वा इन्फ्रा. कंपनीस ११ कोटी ४२ लाखांचा दंड करण्यात आला असून सदरचा एसटीपी देखभालीसह चालविण्यास देण्यासाठी लवकरच टेंडर काढले जाईल, अशी माहिती गुरुवारी स्थायी समिती सभेत देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते.
विश्वा इन्फ्रा कंपनीच्या कामाबाबत अजित ठाणेकर, सत्यजित कदम आदींनी विषय उपस्थित केला. एसटीपी प्लॅँट ‘पीपीपी तत्त्वावर’ चालविण्यास देण्यात आला आहे. ठेकेदाराने एसटीपीचे काम वेळेत पूर्ण केलेले नाही. त्यामुळे त्यांना ब्लॅक लिस्ट करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची ४.५० कोटींची बॅँक गॅरंटी जप्त करण्यात आली आहे तसेच १५ कोटींची देयके थोपविली आहेत. आतापर्यंत त्यांना ११ कोटी ४२ लाखांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड बँक गॅरंटी तसेच देयकामधून वसूल करण्यात येईल. सिव्हीलचे काम ठेकेदाराने केले नसल्याने नवीन निविदा काढून ते पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी प्रशासनाने दिली.
शहरातील कचरा उठावावर सभेत चर्चा झाली. सूरमंजिरी लाटकर यांनी या विषयाकडे लक्ष वेधताना दोन दिवसांत जर कामांत सुधारणा झाली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला तेव्हा मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी, पाच आरसी वाहने सुरू असून जादा सहा डंपर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कचरा उठावाचे काम तीन पाळीत सुरू करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी विविध विषयांवरील चर्चेत जयश्री चव्हाण, रूपाराणी निकम, नीलोफर आजरेकर, उमा इंगळे आदींनी भाग घेतला.