चाचणी परीक्षेत ‘एसटीपी’ पास प्रदूषणात होणार घट : महापालिका प्रशासनाकडून सुटकेचा नि:श्वास
By admin | Published: May 10, 2014 12:18 AM2014-05-10T00:18:49+5:302014-05-10T00:18:49+5:30
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा (एसटीपी) पहिला टप्प्यातील सांडपाण्यावर आज (शुक्रवारी) यशस्वी चाचणी करण्यात आली.
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा (एसटीपी) पहिला टप्प्यातील सांडपाण्यावर आज (शुक्रवारी) यशस्वी चाचणी करण्यात आली. काल (गुरुवारी) पाईपलाईनची चाचणी यशस्वी झाल्याने दुपारी बाराच्या सुमारास प्रत्यक्ष प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले. केंद्रातील पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाल्याने महापालिका प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. ठेकेदाराच्या आर्थिक अडचणीनंतर तांत्रिक कचाट्यात सापडलेला प्रकल्प सुरू करण्यासाठी न्यायालयाचा तगादा असल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या होत्या. केंद्रासाठी वीजपुरवठा करणारा ट्रान्सफार्मर कमी क्षमतेचा निघाल्याने अडचणीत भरच पडली. गेल्या आठवड्यात एअर प्रेशर व लोडच्या चाचण्या घेतल्या. गुरुवारी सायंकाळनंतर जयंती नाला ते सांडपाणी केंद्रापर्यंतच्या चार कि.मी.च्या पाईपलाईनची चाचणी झाली. प्रत्यक्ष सांडपाण्याची यशस्वी चाचणी झाल्याने सांडपाणी केंद्र सुरू होण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात २६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान, महापौर सुनीता राऊत यांनी केंद्रास भेट देऊन पाहणी केली. शहरातील प्रमुख जयंती व दुधाळी नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २० व ९६ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र २००९ मध्ये प्रस्तावित करण्यात आले. राष्टÑीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत मलशुद्धिकरण केंद्राची उभारणी करून २०१०मध्ये ७५ कोटींच्या या प्रकल्पास सुरुवात झाली. हैदराबाद येथील विश्वा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला ठेका मिळाला. केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर महिन्याला किमान २० लाखांचे वीज बिल येणार आहे. यासाठी नागरिकांकडून पाणी बिलातून अधिभार वसुली सुरू केली आहे. (प्रतिनिधी)