‘एसटीपी’ पूर्ण क्षमतेने सुरू
By admin | Published: April 22, 2015 12:17 AM2015-04-22T00:17:40+5:302015-04-22T00:21:23+5:30
प्रशासनाचा दावा : जयंती नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया सुरू
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. जयंती नाल्यातील १०० टक्के दूषित पाण्याचा उपसा करून यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू झाले आहे. शहरातील ६५ टक्के दूषित पाणी थेट नदीत मिळणे बंद होणार आहे. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार येथील नाल्यांतील दूषित पाणी नदीत मिसळते. या पाण्यावर येत्या वर्षभरात प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती जलअभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी (दि.२३) सुनावणी होत आहे. तत्पूर्वी, कोणत्याही परिस्थितीत केंद्र सुरू करून त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे मनपाला गरजेचे आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वाहून नेणाऱ्या पाईपचे काम पूर्ण होताच, सोमवारी रात्रीपासून जयंती नाल्यातील ५५ ते ६० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू केली.
‘राजाराम’सह नऊ प्रोसेसर्सची आज वीज तोडणार
कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखाना, तसेच इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटना वीजपुरवठा खंडित करण्यासंदर्भात महावितरणने मंगळवारी सकाळी नोटीस लागू केली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे २४ तासांची मुदत संपताच आज, बुधवारी सकाळी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली आहे. राजाराम कारखाना व इचलकरंजीतील नऊ प्रोसेसर्स युनिटमालकांनी आपले रसायनमिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत सोडल्याचे आढळून आले होते. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य डॉ. पी. अनबालगन यांनी संबंधित संस्थांचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिला आहे.