मतभेदाला पूर्णविराम; हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करूनच रणनीती - आमदार प्रकाश आवाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 02:16 PM2024-10-18T14:16:20+5:302024-10-18T14:16:50+5:30
बावनकुळे यांनी दिली आवाडे यांच्या निवासस्थानी भेट
इचलकरंजी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली असून, आता मतभेदाला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे यापुढे सुरेश हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करूनच सर्व रणनीती आखली जाईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
आवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर शहरातील दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढून आवाडे-हाळवणकर यांच्या मनोमिलनासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राहुल आवाडे, मोसमी आवाडे, स्वप्नील आवाडे यांच्यासह आवाडे कुटुंबीयांसोबत त्यांनी संवाद साधला.
त्याबद्दल माहिती सांगताना आमदार आवाडे म्हणाले, पक्षासोबत आगामी सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करून पक्षाचे पुढील निर्णय ठरवले जातील. कार्यालयात प्रवेश करण्यासह निवडणुकीची रूपरेषाही ठरवली जाईल.
राहुल आवाडे म्हणाले, भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत आम्ही आणि आमचे कार्यकर्ते यांचे नक्कीच मनोमिलन होईल. त्याचबरोबर फक्त विधानसभेसाठीच नाही, तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र ताकद लावून सर्व ठिकाणी भाजपचा विजय होण्यासाठी नियोजन करणार आहे.
आवाडे यांना निमंत्रण नाही
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेत त्यांची समजूत काढण्यासाठी आयोजित केलेला मेळावा असल्याने आवाडे यांना मेळाव्यास निमंत्रण नव्हते. त्यामुळे मेळावा संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आवाडे यांची बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांना पक्षशिस्तीसंदर्भात सूचना देऊन एकत्रित काम सुरू करण्यासंदर्भात सांगितल्याचे समजते.