माळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा

By admin | Published: February 9, 2015 11:28 PM2015-02-09T23:28:07+5:302015-02-09T23:58:31+5:30

उसाच्या पट्ट्यात नवे उत्पादन : कृष्णात पाटील यांचा नावीन्यपूर्ण प्रयोग

Strawberry mud blazes on the ground | माळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा

माळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा

Next

प्रकाश पाटील - कोपार्डे -माळरानाची जमीन, मुबलक पाणी, उसाला पोषक वातावरण म्हणून नांगरट करून सरी सोडायची व त्यामध्ये उसाची लावण करायची ही मानसिकता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते. मात्र, पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शेतकरी कृष्णात पाटील यांनी याला बगल देऊन आपल्या ३० गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली असून, त्यामध्ये टपोरी फळेही मिळायला सुरुवात झाली आहे. आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात पाटील नेहमीच निष्णात आहेत.कृष्णात पाटील यांना त्यांच्या मित्राने स्ट्रॉबेरीची माहिती दिल्यानंतर आपल्या शेतामध्ये त्यांनी त्या पद्धतीने नियोजन केले. आडवी-उभी नांगरट करून रान तापत टाकले. स्ट्रॉबेरीची मदर प्लांट रोपे कॅलिफोर्निया येथून महाबळेश्वर येथील शेतकरी अथवा डीलर मागवितात. ही मदर प्लांट रोपे भारतात तयार होत नाहीत. मार्च २०१४ मध्ये या मदर प्लांटच्या ५०० रोपांची येथे मागणी नोंदवली. त्याप्रमाणे एक रोप ३० रुपयाला पडले. या मदर प्लांटपासून पाटील यांनी स्वत:च्या नर्सरीत रोपे तयार केली. एका मदर प्लांटपासून ३०-४० रोपे तयार होतात. अशी पाच हजार ५०० रोपे स्वत: तयार केली व आणखी पाच हजार रोपे निगवे येथील प्रमोद पाटील यांच्या नर्सरीतून आणून आॅक्टोबर अखेर लागवड केली. ही स्ट्रॉबेरी ‘विट्रॉडॉन’ जातीची आहेत.
स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केल्यानंतर त्यांना पाट पद्धतीने पाणी देण्यापेक्षा ठिबकने देण्याचे फायदेशीर होईल. त्याचा खते, अन्नद्रव्ये व कीटकनाशकेही देण्यासाठी वापर करता येऊन श्रम कमी होईल म्हणून ठिबक पद्धतीचा वापर केला आहे. यातूनच आठवड्याला चार दिवसांतून एकवेळ १९:१९:१९ खताची चार किलो मात्रा दिली. ५० ते ५५ दिवसांत फळधारणा सुरू होऊन एक-एक स्ट्रॉबेरीचे फळ किमान १०० ते २०० ग्रॅमचे मिळू लागले. यावेळी १२:६१ आणि ०:५२:३४ खत तसेच कॅल्शियम नायट्रेड दोन किलो दहा दिवसांतून देत आहे. स्ट्रॉबेरीसाठी थंड-उष्ण असे महाबळेश्वर पद्धतीचे हवामान लागते. तसे हवामान आपल्याकडे हिवाळ्यात असल्याने साधारण आॅक्टोबर ते मार्च असा सहा महिन्यांचा कालावधी या स्टॉबेरी पिकासाठी पोषक आहे.
सध्या फळधारणा सुरू होऊन एक महिना झाला असून, जानेवारी महिन्यात एक ते सव्वा टन स्ट्रॉबेरी उत्पन्न मिळाले. फळे टपोरी व तजेलदार असल्याने १०० ते १२५ रुपये दर मिळत आहे.
दररोज व्यापारी फोन करून स्ट्रॉबेरीची मागणी करीत असल्याने विक्रीसाठी कष्ट घ्यावे लागत नाहीत. लागवड, खते, मशागत व कीटकनाशकांसाठी आतापर्यंत ७० ते ८० हजार खर्च आला आहे. मात्र फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यांत आणखी ३-४ टन स्ट्रॉबेरीचे उत्पन्न होणार असून, सरासरी १०० रुपयेप्रमाणे दर मिळाला तरी तीन ते चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे पाटील यांनी सांगितले. याचा अर्थ केवळ ३० गुंठे जमिनीत कल्पकता असेल तर उसापेक्षा चांगले उत्पन्न मिळवीत शेती फायद्याची करता येऊ शकते हे सिद्ध होते.

शेतीमध्ये जरा वेगळी वाट शोधली तर मिळालेल्या उत्पादनासाठी बाजारपेठ सहज मिळते. कोल्हापुरातून व्यापारी दररोज संध्याकाळी उद्यासाठी लागणाऱ्या स्ट्रॉबेरी मालासाठी फोन करून पाहिजे तेवढी आॅर्डर देतात. सकाळी आठ वाजेपर्यंत स्ट्रॉबेरी फळांचा तोडा करून ती मागणीच्या प्रमाणात देतो. सध्या १०० ते ११० रुपये दर सुरू आहे. स्ट्रॉबेरीसाठी जमिनीची प्रत हलकी असली तरी चालते. याची रोपे मदर प्लांटपासून केली जातात. हे मदर प्लांट भारतात मिळत नाहीत. महाबळेश्वर येथे सोसायटीमार्फत शेतकरी ते मार्चमध्ये मागवितात. एक ा मदर प्लांटपासून ३० ते ४० रोपे होतात. याची लागवड आॅक्टोबरमध्ये केल्याने फायद्याचे होते. आॅक्टोबर ते मार्च महिन्यांत स्ट्रॉबेरीसाठी पोषक वातावरण असते. हे पीक केवळ सहा महिन्यांचे व फायद्याचेही आहे.
- कृष्णात पाटील (पाडळी खुर्द, ता. करवीर)


कॅलिफोर्नियातून ‘मदर प्लांट’ मागवून एक हजार रोपे तयार करून लागवड
ठिबक पद्धतीचा वापर करून खते, पाणी, कीटकनाशके देऊन तंत्रशुद्ध शेती
खर्च वजा जाता ३० गुंठ्यात, सहा महिन्यांत तीन लाख रुपये उत्पन्न

Web Title: Strawberry mud blazes on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.