दत्तवाडमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:49+5:302021-07-10T04:17:49+5:30
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे पुन्हा कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. गुरुवारी रात्री व ...
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे पुन्हा कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी कुत्र्यांच्या टोळीने दोन वर्षांच्या व सात वर्षांच्या दोन लहान मुलांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. त्यापैकी गंभीर जखमी असणा-या दोन वर्षांच्या सूर्या खत्री याला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दत्तवाड येथे दोन महिन्यांपूर्वी कुत्र्यांनी हल्ला करून एका महिलेला ठार केले होते. तर तीन पुरुषांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीने कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. कुत्र्यांची संख्या कमी होऊन गावात कुत्र्यांचे होणारे हल्ले कमी झाले होते. मात्र, गुरुवारी रात्री आंबेडकरनगर येथील या सातवर्षीय श्रेयस कांबळे या बालकावर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला करून त्याचा चावा घेतला आहे. त्याच्यावर उपचार करून त्याला घरी पाठवले असतानाच शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सूर्या खत्री या दोन वर्षीय बालकावर घराच्या मागच्या बाजूला शाळेच्या मैदानात खेळत असताना सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला केला. लगतच असणा-या प्रवण हेमगिरे यांनी वेळेत धाव घेऊन कुत्र्यापासून त्या बालकाची सुटका केली. मात्र कुत्र्याने तोंडावर, पाठीवर, मांडीवर चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सूर्याचे वडील हॉटेल कामगार असून लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायतीने याबाबत कठोर कारवाई करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
फोटो - ०९०७२०२१-जेएवाय-०२-जखमी बालक सूर्या खत्री.