रस्त्यांचा गुंता; मद्यविक्रेत्यांना चिंता
By admin | Published: April 6, 2017 01:18 AM2017-04-06T01:18:46+5:302017-04-06T01:18:46+5:30
नव्या ‘वाटा’ शोधण्याचे प्रयत्न : मालकी निश्चितीची प्रक्रिया आजपासून; प्रशासकीय पातळीवर गोंधळ
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम, बीअर शॉप सील झाली असली तरी न्यायालयीन निकालाच्या कक्षेत येणारे शहरातील ‘ते’ रस्ते नेमके कोणाचे हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग व कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतावत आहे. त्यावर तोडगा म्हणून आता महापालिकेने रस्ते ताब्यात देण्याची मागणी करायची आणि तसा प्रस्ताव बांधकाम विभागाने राज्य शासनाला पाठवायचा, असे ठरल्याचे सांगण्यात आले.
जसे रस्ते कोणाच्या मालकीचे हा वाद दोन कार्यालयांच्या अधिकाऱ्यांमध्ये रंगला होता, तसा तो महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांत रस्ता महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी कोणी प्रस्ताव तयार करायचा, असाही वाद रंगला आहे. शहर अभियंता कार्यालय आणि नगररचना विभाग यांनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला; परंतु आयुक्त अभिजित चौधरी यांनी सक्त सूचना दिल्याने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व नगररचना सहायक संचालक धनंजय खोत आज, गुरुवारी एकत्र बसून प्रस्ताव तयार करणार आहेत.
‘पुढच्याला ठेच लागल्याशिवाय मागचा माणूस शहाणा होत नाही,’ याचा अनुभव शहरातून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत आला आहे. या रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका प्रशासन करत आहे; परंतु कागदोपत्री ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावावर दिसतात. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाहेर आला त्यानंतर काही दिवसांत बांधकाम विभागाने आपले हात झटकले आणि महापालिकेच्या ताब्यात रस्ते असल्याचा खुलासा केला; परंतु तशी रस्त्यांची कागदपत्रे शोधण्यात आपल्याकडे आहेत का याचा शोध मनपा अधिकाऱ्यांनी घेतला, पण त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे आता दोन्ही यंत्रणा कार्यरत झाल्या असून रस्त्यांचे हस्तांतर महापालिकेकडे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मद्य विक्रेत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय मार्ग
फुलेवाडी खांडसरी ते टेंबलाईवाडी-उचगाव.
दसरा चौक-मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिना ते कळंबा.
पाचगाव ते फुलेवाडी रिंगरोड -खांडसरी.
टोप एमआयडीसी पंचगंगा पूल- कसबा बावडा -ताराराणी चौक- शाहू नाका
राष्ट्रीय महामार्ग - तावडे हॉटेल-ताराराणी चौक-व्हीनस कॉर्नर- दसरा चौक- शिवाजी पूल.