रस्त्यावरील बाजार.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:11+5:302021-02-15T04:21:11+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात पन्नासहून अधिक छोटे-मोठे आठवडी बाजार भरतात. मात्र, यातील बहुतांश बाजार हे मुख्य रस्ता, मुख्य चौकातच भरत असल्याने ...

Street Market ..... | रस्त्यावरील बाजार.....

रस्त्यावरील बाजार.....

Next

कोल्हापूर जिल्ह्यात पन्नासहून अधिक छोटे-मोठे आठवडी बाजार भरतात. मात्र, यातील बहुतांश बाजार हे मुख्य रस्ता, मुख्य चौकातच भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. गर्दीतून वाहतूक सुरू राहिल्याने अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. ‘रस्त्यावरील बाजार’ कोठे भरतात, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि संबंधित प्रशासनाने काय करावे, याबाबत ‘लोकमत’ची आजपासूनची वृत्तमालिका....

जयसिंगपुरात मंडई नावालाच; बाजार रस्त्यावरच

नियंत्रण नसल्याने वाहतुकीची कोंडी : नागरिकांना नाहक त्रास

संदीप बावचे : जयसिंगपुरात मंडई असताना बाजार मात्र रस्त्यावरच भरला जातो. रोजच्या बाजाराबरोबरच आठवडी बाजार शहरातील चार गल्ल्यांत भरत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

इतर शहरांच्या तुलनेत जयसिंगपूरची बाजारपेठ सर्वांत मोठी आहे. ग्रामीण भागातील गावातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात याठिकाणी विक्रीसाठी येतो, तर सांगली, इचलकरंजी, मिरज, आरग या परिसरातून धान्य व्यापाऱ्याबरोबर कपडे, खेळणी, भांडी विक्रेतेही रविवारी आठवडी बाजारात विक्रीसाठी येतात. नगरपालिका रस्ता, वैरण अड्डा, बँक ऑफ इंडिया मार्गासह गल्ली ६ ते ९ मध्ये बाजार भरतो. शहराची व्याप्ती वाढत असल्याने नगरपालिकेने गुरुवारी शाहूनगर, तर बुधवारी आंबेडकर सोसायटी येथे आठवडी बाजार भरला जातो. तरीही मुख्य बाजारातील गर्दी कमी होत नाही. त्यात व्यापारी बेशिस्तपणे बसत असल्याने वाहने सोडाच खरेदीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांनाही पुढे सरकता येत नाही. नगरपालिकेने अस्ताव्यस्त पसरलेल्या बाजाराला शिस्त लावण्याची गरज आहे. (उद्याच्या अंकात मलकापूर बाजार)

याठिकाणी होऊ शकते व्यवस्था...

शहराची व्याप्ती व वाहतुकीची कोंडी, प्रशासनाची डोकेदुखी पाहता सिद्धेश्वर मंदिराजवळील जुन्या मैदानावर एकत्रितपणे रविवारचा आठवडी बाजार भरविण्यासाठी लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासनाने पुढे येण्याची गरज आहे. योग्य रचना करून कार्यवाही व्हावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

धुळीतूनच भाजी खरेदी

लॉकडाऊनमुळे शहरातील दहाव्या गल्लीपासून जय-विजय शाळेपर्यंत रस्त्यावर दैनंदिन बाजार भरत आहे. येथून वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्यावरही धूळ साचलेली दिसते. तीच भाजी ग्राहकांना खरेदी करावी लागते.

कोट- वाढत्या वाहनांमुळे पार्किंगची व्यवस्था आणि शहरातल्या वाढीबरोबर नागरिकांच्या अडचणी या अनुषंगाने पर्यायी बाजार व्यवस्था गरजेची आहे. सर्व गोष्टींचा विचार करून मोकळी जागा असेल त्या ठिकाणी बाजाराबरोबरच पार्किंग व्यवस्थेच्या नियोजनाबाबत पालिकेकडून रस्त्यावरील बाजाराला पर्याय देण्यासाठी प्रयत्न करू.

- आसावरी आडके, महिला बालकल्याण सभापती

फोटो ओळ - जयसिंगपूर शहरात रस्त्याच्या कडेला अशाप्रकारे आठवडी बाजार भरतो. (फोटो-१४०२२०२१-कोल-जयसिंगपूर)

मलकापूरचा बाजार देतोय अपघाताला निमंत्रण

व्यापाऱ्यांचे थेट रस्त्यावरच ठाण : वाहतुकीची कोंडी, जनतेतून संताप

लोकमत न्यूज नेटवर्क

राजू कांबळे

मलकापूर : मलकापूरचा आठवडी बाजार हा शाहूवाडी तालुक्यातील सर्वांत मोठा आहे. मात्र, दिवसेंदिवस हा बाजार कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बाजारातून जाताना कसरत करावी लागत असून, या मार्गावरील गर्दी पाहता, हा बाजार म्हणजे अपघाताला निमंत्रण देणाराच आहे.

स्वातंत्र्य काळापासून मलकापूर बाजारपेठ प्रसिद्ध आहे. पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा या तीन तालुक्यांचे केंद्र म्हणून या बाजारपेठेचा पसारा दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापाऱ्यांची संख्या वाढत गेल्याने कधी हा बाजार कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर आला, हे कळलेच नाही. महामार्गावरील शेंडे गल्ली, विठ्ठल मंदिर, शाळी नाका या परिसरात विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. या मार्गावरून रत्नागिरी, सांगली, कराड, इस्लामपूर आदी मार्गांवरील वाहतूक असते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. त्यातच या परिसरातच शाळा असल्याने यातून मार्ग काढत पुढे जाताना वाहन चालकांबरोबरच विद्यार्थ्यांचीही कोंडी होते. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शाळेपर्यंत जावे लागते. मलकापूर नगर परिषद मात्र याकडे डोळेझाक करीत असून, केवळ करापुरताच आमचा बाजाराशी संबंध अशा भूमिकेत प्रशासन असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते, त्यात बाजाराच्या दिवशी तर वाहने पुढे सरकतच नाहीत. मलकापूर बाजार म्हणजे अपघाताला निमंत्रण ठरत असल्याने वाहनचालकांबरोबरच नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (उद्याच्या अंकात कोतोली बाजार)

हा आहे पर्याय...

वाहतुकीची कोंडी पाहता नगर परिषदेने रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची मुख्य बाजारपेठेत व्यवस्था करणे गरजेचे आहे. तिथे शक्य झाले नाही तर कोंबडी बाजार येथेही व्यवस्था होऊ शकते. त्याशिवाय शाळी नाका ते पेरीड नाक्यादरम्यान खासगी वाहने, रिक्षा पार्किंग केल्यानेही वाहतूक ठप्प होते. या वाहनांची पार्किंग व्यवस्था मलकापूर ते कोकरूड मार्गावर केली, तर या मार्गावरील ताण बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होऊ शकते.

कोट-

कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर बसणाऱ्या विक्रेत्यांना शिस्त लावली जाईल. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पांढरे पट्टे मारून त्यामध्येच बसण्याची सक्ती केली जाईल.

-अमोल केसरकर (नगराध्यक्ष, मलकापूर)

फोटो ओळी : मलकापूर (ता. शाहूवाडी) येथे आठवडी बाजार कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरच भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. (फोटो-१४०२२०२१-कोल-मलकापूर)

कोतोलीच्या बाजारामुळे पश्चिम पन्हाळ्यातील वाहतुकीची कोंडी

विक्रेत्यांच्या मनमानीने थेट रस्त्यावरच विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क

विक्रम पाटील

करंजफेण : पन्हाळा पश्चिम परिसरातील जवळपास चाळीस गाव वाडीवस्तींचे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र म्हणून कोतोली गावची वेगळी ओळख आहे. रस्त्यावर भरणाऱ्या आठवडी बाजाराने परिसरातील वाहनचालक व नागरिक हैराण आहेत. हा बाजार स्थलांतरित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

येथील आठवडी बाजार अनेक वर्षांपासून ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या सभोवताली मंगळवारी भरायचा; परंतु दिवसेंदिवस व्यापाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने बाजाराने आपली जागा सोडली आहे. आता तर तो मुख्य रस्त्यावर भरत आहे. रस्त्याच्या दुतर्फा विक्रेते बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होतेच, त्याशिवाय ग्राहकांना खरेदी करतानाही कसरत करावी लागते. एकमेकांना धक्के देत खरेदीसाठी पुढे जावे लागत असल्याने अनेक वेळा वादाचे प्रसंगही उद्‌भवले आहेत. व्यापाऱ्यांना शिस्त नाही, कोणीही उठतो आणि जागा मिळेल तिथे बसत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या बाजारालगतच प्राथमिक शाळा, विविध बॅँका, पतसंस्थांच्या शाखा, खासगी दवाखाने असल्याने या मार्गावरून नेहमी गर्दी असते. बाजाराच्या दिवशी तर कोंडी होते. बाजारातून मोटारसायकलही जात नसल्याने अचानक एखादा प्रसंग घडला तर त्यातून मार्ग काढून वाहने पुढे सरकणे अडचणीचे ठरत आहे. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने उपाययोजना म्हणून रस्त्यावर पांढरे पट्टे ओढून विक्रेत्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे थोडे दिवसच चालले. पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे सुरू झाले. (उद्याच्या अंकात इचलकरंजी बाजार)

शिस्त लावणार कोण?

पन्हाळा पश्चिम भागातील वाहतून या मार्गावरून असते, ग्रामपंचायतीने प्रयत्न केले. मात्र, त्यांचा फारसा उपयोग झाला नाही. बाजाराला शिस्त लावण्यासाठी आता पोलीस यंत्रणा सक्रिय झाली पाहिजे. त्याशिवाय विक्रेत्यांबरोबरच वाहनचालकांच्या बेशिस्तपणास चाप बसणार नाही.

कोट-

कोतोली बाजारातील गर्दी पाहता, हा बाजार मूळ ठिकाणी भरविण्यासाठी नियोजन केले जाईल. विक्रेत्यांना त्याप्रमाणे सूचना दिल्या जातील. रस्त्याच्या एका बाजूने दुकाने थाटण्यासाठीदेखील नियमावली करणार आहे.

- पी.एम.पाटील (सरपंच, कोतोली)

फोटो : कोतोली (ता.पन्हाळा) येथे प्रमुख रस्त्यावर अस्ताव्यस्त दुकानामुळे रस्त्यामध्ये होत असलेली गर्दी. (फोटो-१४०२२०२१-कोल-कोतोली)

Web Title: Street Market .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.