काँग्रेसची ताकद निम्म्यावर

By admin | Published: February 28, 2017 01:02 AM2017-02-28T01:02:25+5:302017-02-28T01:02:25+5:30

जनाधार घटला : नेत्यांतील कुरघोडी पक्षाच्या मुळावर; ‘माझ्यामुळे काँग्रेस’ ही भावना

The strength of the Congress is half | काँग्रेसची ताकद निम्म्यावर

काँग्रेसची ताकद निम्म्यावर

Next

विश्वास पाटील --कोल्हापूर जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या वर्चस्वाला या निवडणुकीत सुरुंग लागला. मावळत्या सभागृहातील संख्याबळ निम्म्यापेक्षा खाली घसरले. पाच तालुक्यांत काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. नेत्यांतील दुफळी, आत्मविश्वास गमावलेले कार्यकर्ते आणि एकजूट हरविलेली संघटना यामुळे पक्षाला गळती लागल्याचे चित्र या निकालानंतर पुढे आले आहे. त्यात सुधारणा होण्याचीही शक्यता नाही. माझ्यापेक्षा कुणी मोठा होऊ नये या नेत्यांच्या राजकारणात पक्षाची वाताहात होत आहे. ‘मी काँग्रेसचा’ यापेक्षा ‘माझ्यामुळे काँग्रेस’ ही भावना बळावल्याने ही स्थिती निर्माण झाली.
जिल्हा परिषदेत अपवाद वगळता स्थापनेपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या पक्षाची पाळेमुळे ग्रामीण भागात रुजल्यामुळे या महत्त्वाच्या सत्तेवर कायमच पकड राहिली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादीने आव्हान दिले होते. या निवडणुकीत या पक्षाच्या वर्चस्वाला भाजपने विविध पक्षांची व आयात नेत्यांची मोट बांधून आव्हान दिले. त्यामध्ये ते काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले. ‘काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते’ हा अनुभवही या निवडणुकीत खरा ठरला. गत निवडणुकीत कागलमध्ये दिवंगत नेते खासदार मंडलिक यांच्यामुळे सर्व पाच जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे तिथेच सत्तेची पायाभरणी झाली होती. या निवडणुकीत मोठ्या तालुक्यातच काँग्रेस पिछाडीवर गेली. करवीर तालुक्यात आमदार सतेज पाटील यांचा तीन मतदारसंघात पराभव झाला. माजी आमदार पी. एन. पाटील यांनी सहापैकी तीन जागा जिंकल्या. शिंगणापूरच्या जागेवर विजयी झालेल्या रसिका पाटील यांचे पती अमर पाटील ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यामागे होते या रागातून त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. असेच राजकारण रेंदाळमध्ये घडले. तिथे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी सगळी ताकद लावून तानाजी घोडेस्वार या आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. त्यांना कशीबशी ३०८ मते मिळाली व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल हा तब्बल १३ हजार ८५१ मते घेऊन विजयी झाला.
गेल्या विधानसभेला पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. आता जिल्हा परिषदेत सत्ता टिकवतानाही राष्ट्रवादीसह अन्य पक्षांच्या नाकदुऱ्या काढण्याची वेळ पक्षांवर येणार आहे. देश व राज्य पातळीवर पक्षाची वाटचाल बिकट होत आहे. एकूणच जनाधार कमी होत आहे. कागल, गडहिंग्लज, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांत पक्षाकडे नेतृत्वच नाही. तिथे संघटना उभी करणे हेच मोठे आव्हान आहे; परंतु हे आव्हान पेलायचे कुणी, हाच मूळ चिंतेचा प्रश्न आहे. करवीर व चंदगड तालुक्यांत हा पक्ष पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिला. कोतोली, कळे, शिरोली पुलाची, रूकडी, शिंगणापूर, कसबा सांगाव, गिजवणे आणि कोळिंद्रे या मतदारसंघात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. यवलूज, कुंभोज, पट्टणकोडोली, रेंदाळ, हुपरी, बड्याचीवाडी आणि पिंपळगांव मतदारसंघात तर चौथ्या क्रमांकावर फेकली आहे.


‘करवीर’ लिमिटेड पक्ष
काँग्रेसचे नेते ‘राष्ट्रवादी’ची ही तर ‘कागल लिमिटेड पार्टी’ अशी हेटाळणी करतात; परंतु काँग्रेसची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. हा पक्ष ही ‘करवीर लिमिटेड पार्टी’ होऊ लागला आहे.
गगनबावड्यात १00 टक्के यश
गगनबावडा तालुक्यात काँग्रेसने दोन्हीही जागा जिंकल्या. तिथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी एम. जी. पाटील यांना ताराराणी आघाडीतून मैदानात उतरविले होते. महाडिक तिथे गेल्यामुळे काँग्रेस जास्त संघटित झाली व ‘बाहेरचे नेतृत्व झुगारायचे’, या भावनेतून मतदान झाल्याने दोन्ही जागा जिंकल्या. पी. जी. शिंदे यांचा गट प्रबळ असतानाही तिसंगी मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. त्यास त्यांचा पक्षबदलूपणा कारणीभूत होता. शिंदे हे भाजपचे अध्यक्षपदाचे दावेदार होते, परंतु त्यांना मतदारांनी कोल्हापूरलाच पाठविले नाही.
पाच तालुक्यांत शून्यावर
हातकणंगले,शाहूवाडी, पन्हाळा, कागल आणि गडहिंग्लज या तालुक्यांत निम्म्या म्हणजे ३१ जागा होत्या, तिथे काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. हातकणंगले तालुक्यात आवाडे गटाने स्वबळावर स्थानिक आघाडी करून दोन जागा निवडून आणल्या.


पिछाडी अशीही
गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसला तब्बल २ लाख (१५.३७ टक्के) मते कमी पडली. शिवाय या पक्षाच्या १७ जागा कमी झाल्या म्हणजे निम्म्याहून जास्त जागा या पक्षाने गमावल्या.

गतनिवडणुकीतील मतांची टक्केवारी
एकूण मतदान : १४ लाख ७७ हजार ४७५
काँग्रेसला मिळालेली मते : ५ लाख ४३ हजार २९२
एकूण मतदानाच्या प्रमाणात टक्केवारी : ३६.७७

काँग्रेसचे तालुकानिहाय सदस्य
करवीर ०५
राधानगरी०२
गगनबावडा०२
चंदगड०२
शिरोळ०१
भुदरगड०१
आजरा०१

Web Title: The strength of the Congress is half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.