पट्टणकोडोलीत उमेदवारीसाठी ताकद पणास

By admin | Published: January 3, 2017 01:12 AM2017-01-03T01:12:42+5:302017-01-03T01:12:42+5:30

उमेदवारी देताना गटबाजीही ठरणार डोकेदुखी : अद्याप कोणत्याही पक्षाने आघाडीबाबत धोरण स्पष्ट न केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था

The strength factor for the candidature of the cast | पट्टणकोडोलीत उमेदवारीसाठी ताकद पणास

पट्टणकोडोलीत उमेदवारीसाठी ताकद पणास

Next

इरफान मुजावर --पट्टणकोडोली --आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पट्टणकोडोली मतदारसंघ ओबीसी महिला आणि पट्टणकोडोली व रुई पंचायत समिती ओबीसी पुरुष जागेसाठी राखीव झाला आहे. सद्य:स्थितीत बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे कोणत्याच पक्षाला मतदारसंघावर आपली दावेदारी सांगता येणार नाही. मात्र, अद्यापही कोणत्याही पक्षाने आघाडीबाबत धोरण स्पष्ट न केल्याने व पक्षांतर्गत गटबाजीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी आपली ताकद पणाला लावली असली तरीही उमेदवारीबाबत अस्पष्टताच आहे.
पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ हातकणंगले तालुक्यातील महत्त्वाचा मतदारसंघ आहे. यामध्ये पट्टणकोडोली, रुई, माणगाव व माणगाववाडी या गावांचा समावेश होतो. मतदारसंघावर सुरुवातीपासून जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे वर्चस्व होते, तर पंचायत समितीसाठी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दावेदारी होती. सन २००७ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसचे कुमार खूळ, पट्टणकोडोली पंचायत समितीसाठी शिवसेनेचे साताप्पा भवान व रुई पंचायत समितीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अरुण मगदूम निवडून आले होते.
२०१२ च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच पट्टणकोडोलीतील सामाजिक वातावरण ढवळून निघाले. याचा फायदा मतदारसंघात नावापुरत्या असणाऱ्या राष्ट्रवादीला झाला. यातूनच काँग्र्रेस, शिवसेनेच्या वर्चस्वाला पूर्णविराम देत राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समितींवर झेंडा फडकविला. यावेळी जिल्हा परिषदेसाठी धैर्यशील माने आणि पंचायत समितीसाठी प्रभावती पाटील व शीतल यादव निवडून आल्याने काँग्रेस व शिवसेनेची दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे २०१२ नंतर मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पट्टणकोडोली मतदारसंघ ओबीसी महिला जागेसाठी राखीव झाला आहे. मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व असले तरी आवाडे-आवळे यांच्यातील वादामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी आवाडे देणार की, आवळे देणार यावर प्रश्नचिन्ह आहे. जवाहर साखर कारखान्यामुळे मतदारसंघात आवाडे गटाचे अस्तित्व असल्याने गटाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. तर हा मतदारसंघ माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्याकडे आहे. पट्टणकोडोलीत पंचायत समितीसाठी शिवसेना मजबूत आहे. यापूर्वी शिवसेना स्वबळावर लढत आली आहे. मात्र, या निवडणुकीसाठी योग्य जागा वाटप होत असेल, तर शिवसेना हातकणंगले तालुक्यात भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत आहे. माणगाव व माणगाववाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गोळाबेरीज मोठ्या प्रमाणात आहे. मतदारसंघातील सर्वच गावांत भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष वाढीस मदत झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने मतदारसंघ काबीज केला असला, तरी विकासाच्या कारणावरून ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर आहे. ताराराणी आघाडीही होण्याची शक्यता आहे. जनसुराज्य, रासप व आरपीआयची गोळाबेरीज विजयासाठी जमेत धरावी लागणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे कोणताही पक्ष मतदारसंघावर थेट आपली दावेदारी सांगू शकत नाही. मात्र, अद्यापही कोणत्याही पक्षाची आघाडीबाबतची धोरणे स्पष्ट झालेली नाहीत. तसेच पक्षातील गटबाजीही उमेदवारी देताना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे ओबीसी दाखले उपलब्ध असणाऱ्या इच्छुकांनी पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. उमेदवारी वाटपानंतर बंडखोरीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे.


पंचायत समिती
काँग्रेस (आवाडे गट) - संतोष शेळके
काँग्रेस (आवळे गट) - पोपट ओमापुजारी, सतीश पुजारी
भाजप - परशराम डावरे, संदीप माळी, शिरीष शिरगुप्पे
शिवसेना - अरुण माळी, मुरारी ढबू, शिवानंद स्वामी, लक्ष्मण पुजारी, राजू कोळी
राष्ट्रवादी (माने गट) - वसंत बोंगाळे, खाना अवघडे
इतर - प्रमोद बोरगावे, संदीप फगरे, रायगोंडा डावरे
पंचायत समिती - रुई
अजीम मुजावर, दिलीप साळुंखे आणि झाकीर भालदार (राष्ट्रवादी / माने गट)
२०१२ मतदारसंघात झालेली लढत
पट्टणकोडोली जिल्हा परिषद
१) धैयर्शील संभाजीराव माने (राष्ट्रवादी)- १०६९७
२) शिरीष आण्णासो देसाई (कॉंग्रेस)- ५८७२
३) अरुण नाभीराज मगदूम (शेतकरी संघटना)- ४२१९
पट्टणकोडोली पंचायत समिती
१) प्रभावती राजगोंडा पाटील (राष्ट्रवादी)- २९१४
२) संगीता बाळासो कागले (अपक्ष) - २३८८
३) संगीता गोरखनाथ माळी (शिवसेना)- १५०१
रुई पंचायत समिती
१) शीतल जितेंद्र यादव (राष्ट्रवादी) - ४५७५
२) रेखा जयसिंग कांबळे (आवळे गट) - ३७१९
३) मनीषा दीपक गवळी (आवाडे गट) - २४८४


इच्छुक उमेदवार
जिल्हा परिषद
काँग्रेस (आवाडे गट)-
राणी बिरू धनगर, वंदना मगदूम
भाजप - अंजली धीरज भोजकर, आरिफा आदम शिकलगार,
वैशाली आडके
शिवसेना - सुधा स्वामी
राष्ट्रवादी (माने गट) - स्मिता महेश नाझरे, शीतल प्रकाश बोंगाळे

Web Title: The strength factor for the candidature of the cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.