विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला ‘केआयटी’च्या लँग्वेज लॅबचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:20 AM2021-01-02T04:20:54+5:302021-01-02T04:20:54+5:30
कोल्हापूर : येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची लँग्वेज लॅब (भाषा प्रयोगशाळा) ही विद्यार्थ्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी ...
कोल्हापूर : येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची लँग्वेज लॅब (भाषा प्रयोगशाळा) ही विद्यार्थ्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आदर्शवत ठरत आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटी) गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व संभाषण कौशल्य सुधारण्यासाठी केआयटीला १२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
आवश्यक असणारी संगणक प्रणाली आणि अद्ययावत सुविधा असणारी कोल्हापूरमधील ही एकमेव लॅब आहे. या निधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी त्यांचे इंग्रजी संभाषण, आत्मविश्वास, संभाषण चातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास सुधारण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी आणि लॅबचे सहसमन्वयक डॉ. महेश शिंदे यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांसाठी विविध सत्रे सुरू आहेत. या लॅबच्या उभारणीसाठी संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले आदींचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिक्रिया
आवश्यक सुविधा आणि विद्यार्थी यांचा विचार करून केआयटीला या लॅबच्या केंद्राची मान्यता मिळाली आहे. लँग्वेज लॅब म्हणजे फक्त भाषा उच्चारण आणि वाणीशुद्धी असे नाही, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या अनेकविध गोष्टी करता येतात.
- डॉ. विलास कार्जिन्नी
चौकट
व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो
इंग्रजी आणि उत्कृष्ट संभाषण कौशल्य हे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाप्रमाणे लँग्वेज लॅबमध्ये शिकता येतात. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या कौशल्यांवर आधारित वेगवेगळे प्रयोग करता येतात. स्वत:ची निरीक्षणे नोंदविता येतात. त्यामुळे त्यांच्या वैचारिक प्रक्रियेत सुधारणा होऊन व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, असे डॉ. महेश शिंदे यांनी सांगितले.
फोटो (०१०१२०२०-कोल-केआयटी लँग्वेज लॅब) : कोल्हापुरातील केआयटी महाविद्यालयातील लँग्वेज लॅबमध्ये इंग्रजी संभाषण, संभाषण चातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.