कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला होमिओपॅथी महाविद्यालयाचे बळ
By पोपट केशव पवार | Published: October 14, 2024 05:08 PM2024-10-14T17:08:16+5:302024-10-14T17:09:15+5:30
पोपट पवार कोल्हापूर : सर्व अत्याधुनिक सुविधा, कमीत कमी शुल्कात अभ्यासक्रमाला प्रवेश. यामुळे कोल्हापुरात मंजूर झालेल्या शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयामुळे ...
पोपट पवार
कोल्हापूर : सर्व अत्याधुनिक सुविधा, कमीत कमी शुल्कात अभ्यासक्रमाला प्रवेश. यामुळे कोल्हापुरात मंजूर झालेल्या शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेला खऱ्या अर्थाने बूस्टर मिळणार आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी होमिओपॅथीचा प्रसार सुरू केला होता. राजर्षींच्या याच विचारांना बळ देण्याच्या अनुषंगाने सुरू होणारे राज्यातील हे दुसरे शासकीय महाविद्यालय होमिओपॅथीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व होमिओपॅथी उपचार घेणारे रुग्ण यांच्यासाठी नवसंजीवनी ठरणार आहे.
मौजे सांगाव (ता. कागल) येथे चार एकर परिसरात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून सुरू होणाऱ्या या महाविद्यालयासोबत ६० खाटांचे रुग्णालयही मंजूर झाले आहे. होमिओपॅथी उपचार पद्धती प्रचंड महागडी असल्याने ती सर्वसामान्य रुग्णांना घेणे परवडणारे नाही.
मात्र, शासकीय होमिओपॅथी रुग्णालयात ही सेवा अल्पदरात उपलब्ध होणार आहे. दीर्घकालीन, जुनाट आजारांवर होमिओपॅथी उपचार पद्धती गुणकारी मानली जाते. त्यामुळे अलीकडच्या काळात होमिओपॅथी उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, हे उपचार महागडे असल्याने ते सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत. शासकीय होमिओपॅथी रुग्णालय झाले तर हे उपचार नाममात्र दरात मिळणार आहेत.
जिल्ह्यातील तिन्ही कॉलेज खासगी
कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर येथे जे.जे. मगदूम, हौसाबाई मगदूम व कोल्हापूर शहरात जगद्गुरू पंचाचार्य होमिओपॅथिक असे तीन कॉलेज आहेत. ही तिन्ही कॉलेज खासगी असल्याने येथील शुल्कही लाखाच्या घरात आहे. शासकीय महाविद्यालयात मात्र, काही हजारांमध्ये विद्यार्थ्यांना होमिओपॅथीमधून बीएचएमएसची पदवी घेता येणार आहे.
शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जिल्ह्यात व्हावे यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रयत्न करत होतो. या प्रयत्नाला यश आले असून या महाविद्यालयामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अल्पशुल्कात प्रवेश घेणे शक्य होणार आहे. -डॉ. राजकुमार पाटील, अध्यक्ष होमिओपॅथी मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन, कोल्हापूर.
दीर्घकालीन आजार असणारे रुग्ण होमिओपॅथीचे उपचार घेतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना हे महागडे उपचार घेणे शक्य नाही. शासकीय होमिओपॅथी रुग्णालय झाले तर अल्प दरात हे उपचार घेता येऊ शकतील. - डॉ. प्रिया दंडगे, होमिओपॅथीतज्ज्ञ, कोल्हापूर.