पोलिसांच्या अंगात बळ, पण छातीत कळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 10:59 AM2019-12-05T10:59:35+5:302019-12-05T11:00:27+5:30
सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचे आरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचाºयांसाठी धोकादायक ठरत आहे.
शरद जाधव
सांगली : सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचेआरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यातील पोलीस दल थोडा वेळ सोडला, तर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या बंदोबस्तावर तैनात आहेच. एप्रिल महिन्यातील लोकसभा निवडणूक, त्यानंतर थोड्याच कालावधित महापूर, लगोलग विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस सलग पोलीस बंदोबस्तात कायम आहेत. ऊन, पावसाची तमा न बाळगता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे.
या सलगच्या ड्युटीमुळेच पोलिसांना हृदयविकाराचा मोठा त्रास जाणवत आहे. अनेकवेळा बंदोबस्तासाठी तास न् तास उभे राहावे लागत असल्याने, पायाला सूज, टाचा दुखण्यासह मणक्याचेही विकार जडले आहेत. त्यातच रात्री-अपरात्रीच्या ड्युटीमुळे विश्रांती कमी मिळत असल्यानेही पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.
पोलीस दलातील नवीन कर्मचारी व अधिकारी आपल्या आरोग्याबाबत सजग असले तरी, सेवेत काही वर्षे रुळलेल्या कर्मचाऱ्यांना कामाचा वाढता ताण व अन्य कारणामुळे व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांसाठी परेडसह इतर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, वाढत्या कामामुळे त्यात कर्मचाऱ्यांना सहभागी होता येत नसल्याचे चित्र आहे.
आरोग्य चांगले राहावे व त्यांना आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी पोलीस दलातर्फे आरोग्य शिबिरांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात येते. मात्र, केवळ मार्गदर्शनाने थोड्या कालावधीकरिता कर्मचाऱ्यांत सजगता निर्माण होत असली तरी, त्यानंतर ती सजगता कायम राहत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.