विमानतळाची सुरक्षा भक्कम करा : ‘डीजीसीए’च्या पथकाची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 08:49 PM2019-09-26T20:49:21+5:302019-09-26T20:50:42+5:30
वार्षिक तपासणीअंतर्गत ‘डीजीसीए’च्या पथकाने कोल्हापूर विमानतळाला भेट दिली. तपासणीसाठी हे पथक मंगळवारी (दि. २४) विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतल्यानंतर त्यांनी तपासणीचे काम सुरू केले. या पथकातील ‘डीजीसीए’च्या संचालक सुनेत्रा सक्सेना आणि संयुक्त सरव्यवस्थापक अमन सैनी यांनी धावपट्टीची पाहणी केली.
कोल्हापूर : विमानतळाच्या मुख्य इमारत, पार्किंगच्या ठिकाणांसह संपूर्ण परिसरातील सुरक्षा अधिक भक्कम करा. सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घ्या. नाइट लँडिंग सुविधेचे काम दर्जेदार करा, अशी सूचना नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या (डीजीसीए) पथकाने बुधवारी केली आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली.
वार्षिक तपासणीअंतर्गत ‘डीजीसीए’च्या पथकाने कोल्हापूर विमानतळाला भेट दिली. तपासणीसाठी हे पथक मंगळवारी (दि. २४) विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर प्राथमिक स्वरूपातील माहिती घेतल्यानंतर त्यांनी तपासणीचे काम सुरू केले. या पथकातील ‘डीजीसीए’च्या संचालक सुनेत्रा सक्सेना आणि संयुक्त सरव्यवस्थापक अमन सैनी यांनी धावपट्टीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मोठी विमाने उतरताना अथवा उड्डाण करताना अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे, ते जाणून घेतले. विस्तारीकरणांतर्गत सुरू असलेल्या धावपट्टीचे विस्तारीकरण आणि संरक्षक भिंतीच्या बांधकामाची पाहणी करून त्याचा दर्जा तपासला. विमानोड्डाण क्षेत्रातील दूर केलेल्या अडथळ्यांची त्यांनी माहिती घेतली. टर्मिनल बिल्डिंग आणि एटीआर टॉवरच्या बांधकामाचा आराखडा त्यांनी पाहून त्याबाबत काही सूचना केल्या असल्याचे कटारिया यांनी सांगितले.
प्रतीक्षा कक्षातील सुविधा वाढवा
या पथकाने बुधवारी विमानतळाचे प्रवेशद्वार, सुरक्षा व्यवस्था, तिकीट कौंटर, प्रवाशांची बैठक व्यवस्था आणि पार्किंग, आदी सुविधांची पाहणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत पाहणीचे काम सुरू होते. प्रवाशांसाठी असलेल्या प्रतीक्षा कक्षातील (वेटिंग रूम) सुविधा वाढविण्याची सूचना या पथकाने केली. विमानतळाच्या मुख्य इमारतीबाहेर एकाच प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून प्रवासी आणि नागरिकांची तपासणी केली जाते. वाहनतळाच्या ठिकाणाहून प्रवासी, नागरिक हे थेटपणे मुख्य इमारतीकडे जातात. सुरक्षेच्या दृष्टीने त्याबाबत दक्षता घ्यावी, असे पथकाने सांगितले असल्याची माहिती कटारिया यांनी दिली.