कोल्हापूरचा फुटबॉल इतिहासाप्रमाणे मजबूत व्हावा-- चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:21 AM2019-06-09T01:21:14+5:302019-06-09T01:22:40+5:30

देशात २२ प्रादेशिक भाषा बोलणारे लाखो खेळाडू आहेत. त्यांना त्यांच्या भाषेत प्रशिक्षण दिल्यास खेळात मोठी सुधारणा होते :- अंजू तुरंबेकर

 Strengthen Kolhapur's futuristic history - live dialogue with the person in the discussion | कोल्हापूरचा फुटबॉल इतिहासाप्रमाणे मजबूत व्हावा-- चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

कोल्हापूरचा फुटबॉल इतिहासाप्रमाणे मजबूत व्हावा-- चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

Next

सचिन भोसले।
कोणतीही गोष्ट मातृभाषेतून सांगितल्यास ती चटकन आत्मसात केली जाते. म्हणून देशाच्या फुटबॉल विकासासाठी हाच प्रयोग भारतीय फुटबॉल महासंघाने अंंगीकारला आहे. यात देशातील २२ अधिकृत भाषांसह अन्य बोलीभाषांतही फुटबॉलचे ग्रासरुट लीडर्स प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे महासंघातर्फे चक्क मराठी भाषेतून ग्रास रूट लीडर्सचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. याकरिता भारतीय फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूट लीडर्सच्या प्रमुख व एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या ग्रास रूट लीडर्सच्या सदस्या अंजू तुरंबेकर यांनी स्वत: हे प्रशिक्षण कोल्हापुरातील फुटबॉल प्रशिक्षकांना दिले. यानिमित्त त्यांच्याशी साधलेला थेट संवाद.

प्रश्न : फुटबॉल महासंघातर्फे प्रादेशिक भाषेत हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचा उद्देश काय?
उत्तर : मातृभाषेतून प्रत्येक गोष्ट सांगितल्यानंतर ती मनाला भिडते. त्यातून अपेक्षित निकाल मिळतो. देशातील २२ प्रादेशिक भाषा बोलणारे लाखो फुटबॉलपटू आहेत. त्यांना त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर त्यांच्या खेळात सुधारणा होते. याकरिता पहिला घटक म्हणून इन्स्ट्रक्टर, त्यानंतर प्रशिक्षक आणि पुढील टप्पा खेळाडू होय. खेळाडूंनी त्यांना पडलेले प्रश्न मातृभाषेतून विचारल्यानंतर प्रशिक्षक अधिक खुलून बोलतात. विशेषत: खेळाडू त्यांना शंकाही विचारतात. त्यामुळे खेळातील चुका सुधारण्यास मदत होते. त्यामुळे मातृभाषेत प्रयोग करण्यात आला. त्याची सुरुवात मराठीतून करण्यात आली.

प्रश्न : या विशेष प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षकच का असतो?
उत्तर : खेळाडू घडविण्यासाठी महत्त्वाचा घटक म्हणून प्रशिक्षक ही बाब फुटबॉलसाठी महत्त्वाची आहे. एक तंत्रशुद्ध प्रशिक्षक घडविल्यानंतर हजारो खेळाडू तयार होतात. यात प्रशिक्षक जे शिकवतील तेच पुढे ही खेळाडू आत्मसात करतात. त्यामुळे हा महत्त्वाचा घटक मानून महासंघाने त्यांच्याकरिता ग्रासरूट लीडर्सचा प्रोग्रॅम तयार केला. त्याकरिता सर्वोत्तम असे ११ ग्रासरूट इन्स्ट्रक्टर देशपातळीवर कार्यरत आहेत. .

प्रश्न : कोल्हापूरचा फुटबॉल आणि देशातील फुटबॉलमध्ये काय फरक आहे ?
उत्तर : कोल्हापूरच्या फुटबॉलला मजबूत इतिहासाची जोड आहे. मात्र, त्याप्रमाणे विकास झालेला नाही. पॅशन आहे. मात्र, मनापासून यात कष्ट करायची तयारी नाही. त्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय संघांत कोल्हापूरचे नगण्य खेळाडू पोहोचतात. प्रशिक्षकांचाही सरावातील अनुभव कमी आहे. याउलट गोवा, कोलकाता आणि पूर्वोत्तर राज्यात फुटबॉल हा खेळ रक्तात भिनला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पूर्वोत्तर राज्यांतील खेळाडूंचाच फुटबॉलमध्ये वरचष्मा आहे. हा टक्का वाढावा याकरिता अशा प्रकारचे प्रशिक्षण महासंघ ‘के.एस.ए.’मार्फत राबवीत आहे

कोण आहे  अंजू तुरंबेकर?
अंजू या मूळच्या गडहिंग्लजमधील बेकनाळ येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. केवळ फुटबॉलसाठी घरी न सांगता त्यांनी पुणे गाठले. महिला खेळाडू, प्रशिक्षक ते भारतीय फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूटच्या प्रमुख असा थक्क करणारा प्रवास त्यांनी केला आहे. याशिवाय एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट समिती सदस्या म्हणून त्या कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय ‘ए’ लायसेन्स मिळविणाºया त्या पहिल्या भारतीय आहेत.

Web Title:  Strengthen Kolhapur's futuristic history - live dialogue with the person in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.